कल्याण : दिवाळी सणाच्या काळात नागरिकांना चालण्यासाठी मोकळे पदपथ, रस्ते पाहिजेत. रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त पाहिजे म्हणून टिटवाळा अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी गेल्या दोन दिवसात टिटवाळा आणि शहाड रेल्वे स्थानक भागात सकाळ ते संध्याकाळपर्यंत कारवाई करून तीन टेम्पो सामान जप्त केले. अनेक फेरीवाल्यांच्या हातगाड्यांचा जेसीबीच्या साहाय्याने जागीच चुरा करण्यात आला. तर काही जप्त करून नेण्यात आल्या.
सणासुदीच्या काळात नागरिकांना चालण्यासाठी मोकळे रस्ते, पदपथ पाहिजेत म्हणून गेल्या दोन दिवसापूर्वी बेकायदा बांधकामांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी फेरीवाला हटाव पथकाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक टिटवाळा पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. टिटवाळा पूर्व भाग हा सर्वाधिक वर्दळीचा आहे. यापूर्वी पाच ते सहा वेळा या भागातील दुकानदारांचे निवारे, हातगाड्या, टपऱ्या अ प्रभागाने जप्त, तोडून टाकल्या होत्या. तरीही आता पुन्हा फेरीवाल्यांनी या भागात पदपथ अडवून बस्तान बसविण्यास सुरूवात केली होती. टिटवाळा गणेश मंदिराकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे.
तसेच, रेल्वे स्थानक भागात अरूंद रस्ता, त्यात फेरीवाले रस्त्याच्या दुतर्फा बसत असल्याने साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी पदपथ रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांचे सामान जप्त करणे आणि हातगाड्या जागीच तोडून टाकण्याची कारवाई केली. अचानक कारवाई सुरू होताच फेरीवाले सामान घेऊन पळू जाऊ लागले. पण त्या फेरीवाल्यांना जागीच पकडून त्यांच्या जवळील सर्व सामान जप्त करण्यात आले. पदपथावरील हातगाड्या, टपऱ्या जागीच तोडून टाकण्यात आल्या. या कारवाईच्यावेळी पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे धडक कारवाई सुरू असताना कोणीही फेरीवाला कारवाई पथकाला विरोध करण्यासाठी पुढे सरसावला नाही. या कारवाईमुळे टिटवाळा पूर्व, पश्चिम आता फेरीवाला मुक्त झाला आहे.
या कारवाईनंतर साहाय्यक आयुक्त पाटील यांनी शहाड पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भाग आणि परिसरातील रस्ते, पदपथांवरील फेरीवाल्यांवर कारवाई केली. या कारवाईच्यावेळीही फेरीवाल्यांचे सामान, हातगाड्या जप्त करण्यात आल्या. रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आत एकाही फेरीवाल्याने बसू नये. पादचाऱ्यांचे रस्ते, पदपथ अडवून बसू नये अशा वारंवार सूचना देऊन फेरीवाले ऐकत नसल्याने अखेर साहाय्यक आयुक्त पाटील यांनी फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली. या कारवाईमुळे दिवाळीपूर्वी खरेदी केलेला माल पालिका पथकाने जप्त केल्याने फेरीवाल्यांची पंचाईत झाली.
गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत अ प्रभाग हद्दीतील बेकायदा बांधकामे करणारे भूमाफिया, फेरीवाल्यांचा पूर्ण बंदोबस्त साहाय्यक आयुक्त पाटील यांनी केल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. अशाप्रकारची कारवाई यापूर्वी कधीही अ प्रभाग हद्दीत झाली नव्हती, असे नागरिक सांगतात. आयुक्त अभिनव गोयल यांनी साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या या आक्रमक कारवाई बद्दल समाधान व्यक्त केले आहे. डोंबिवलीत अशाप्रकारची कारवाई फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आणि ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्याकडून सुरू आहे.