कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील प्रभागस्तरावरील बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी प्रभागातील साहाय्यक आयुक्तांंवर शासन निर्णयाप्रमाणे सोपवली आहे. बेकायदा बांधकामांविषयीचे शासन आदेश, न्यायालयीन संपर्क या कामासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी आणि नागरिकांना घर बसल्या तक्रारी करता याव्या म्हणून आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून १८००२३३४३९२ हा सुविधा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांंनी ठाणे पालिका हद्दीतील बेकायदा इमारती तोडण्यासाठी विशेष कार्यक्रम घोषित केल्यानंतर कल्याण डोंबिवली पालिकेनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतल्याने भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मागील २५ वर्षाच्या कालावधीत एक लाख ६७ हजार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. याशिवाय मागील तीन वर्षाच्या काळात टोलेजंग ६५ बेकायदा इमारती उभारून भूमाफियांनी या इमारतींना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून या बेकायदा इमारतीमधील सदनिका नागरिकांना विकल्या आहेत. या बेकायदा बांधकाम प्रकरणी हरिश्चंद्र म्हात्रे, वास्तुविशारद संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत.

हेही वाचा… घोडबंदरमधील काही भागात उद्या पाणी नाही

शहराचे नियोजन बिघडवणारी एवढी बेकायदा बांधकामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांंनी कशी होऊन दिली. तेथील प्रशासकीय यंत्रणा काय करत होती, असे प्रश्न करून महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून उभारलेल्या डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश मुख्य न्यायमूर्ती देंवेद्र उपाध्याय, न्यायमूर्ती आरिफ डाॅक्टर यांंनी दिले आहेत. या कारवाईचा अहवाल प्रतिज्ञापत्रासह देण्यासाठी पालिका आयुक्तांना २४ जानेवारी रोजी स्वता उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

या सगळ्या प्रकरणावरून आयुक्त डाॅ. जाखड यांंनी नगररचना विभाग, अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांना जाब विचारून तातडीने बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ मधील कलमानुसार २६०, २६७, ४७८, १९६६ मधील तरतुदी मधील कलम ५२, ५३, ५४ नुसार बेकायदा बांधकामांवर कारवाईचे अधिकार प्रभाग अधिकारी (साहाय्यक आयुक्त) यांना आहेत. तीन वर्षापूर्वी शासन सेवेतून पालिकेत आलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्यावरील बालट टाळण्यासाठी तत्कालीन आयुक्तांशी चर्चा करून ही जबाबदारी प्रभागातील अधीक्षकांवर सोपवली होती. कायद्याने अधिकार नसल्याने अधीक्षक बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पुढाकार घेत नव्हते. यामुळे शहरात बेकायदा बांधकामे मागील दोन वर्षात वाढली, अशा तक्रारी आहेत.

आयुक्त इंदुराणी जाखड यांनी ही चूक सुधारून बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी पुन्हा प्रभाग अधिकारी तथा साहाय्यक आयुक्तांवर सोपवली आहे. यामुळे साहाय्यक आयुक्त आता स्वताहून बेकायदा बांधकामे तोडतात की पोलीस बंदोबस्त मिळत नाही म्हणून टाळाटाळ करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

घर खरेदीत नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी प्रभाग अधिकारी पदनिर्देशित अधिकारी आहेत. बेकायदा बांधकामांच्या तक्रारीसाठी सुविधा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. – डाॅ. इंदुराणी जाखड, आयुक्त.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assistant commissioner responsible for demolishing illegal constructions in kalyan dombivli municipal limits dvr