ठाणे – घोडबंदर येथील कासारवडवली भागात शनिवारी दुपारी एका कारने अचानक पेट घेतला. कार पेट घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकासह तिघेजण कारमधुन बाहेर पडले त्यामुळे ते बचावले. कार पूर्णपणे जळाली असून या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
घोडबंदरहून ठाणेच्या दिशेने कार चालक वाहतुक करत होता. कारमधुन चालकासह तीन जण प्रवास करत होते. शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तो कासारवडवली सिग्नल जवळ आला असता, त्याच्या कारने अचानक पेट घेण्यास सुरूवात केली. कार पेट घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर चालक आणि इतर दोघे कारमधुन बाहेर पडले. त्यानंतर अवघ्या काही क्षणात कारने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच, बाळकुम अग्निशमन दलाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान, ठाणे शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. सुमारे पाऊण तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविणे पथकांना शक्य झाले. परंतु या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळविताना येथील वाहतूक सुमारे १ तासासाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर बसला.