Premium

कल्याणमध्ये विकसित भारत योजनेच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन

समन्वयक उपायुक्त जाधव यांना आयुक्त जाखड यांची शिस्तभंगाची नोटीस

bad planning of the Evolved Bharat Yojana program in kalyan
संकल्प यात्रा मोहीम.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण जनहिताच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशात सुरू करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बुधवारी केंद्रीय सहसचिवांच्या उपस्थितीत येथे संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनात अनेक त्रृटी, ढिसाळ नियोजन आढळून आल्याने पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक उपायुक्त धर्येशील जाधव यांना शिस्तभंग कारवाईची नोटीस बजावली आहे.

येत्या तीन दिवसात या नोटिसीला उत्तर द्या. अन्यथा आपल्या विरूध्द शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी उपायुक्त जाधव यांना दिला आहे. पालिकेत पदभार स्वीकारल्यानंतर अशा प्रकारची एका प्रथम श्रेणी अधिकाऱ्या विरूध्द झालेली ही पहिलीच कारवाई आहे. यापूर्वी आयुक्त जाखड यांनी एक वरिष्ठ अधिकाऱ्याला आपले काम हे दालनात बसून करायचे नाही. आपण क्षेत्रीय भागात नियमित अधिकाधिक वेळ दिला पाहिजे, असे सांगून संबंधित घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्याची कानउघडणी केल्याचे समजते.

आणखी वाचा-कल्याण : केडीएमटीच्या कार्यशाळेला आग, आगीत दोन बस खाक

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २८ नोव्हेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत शंहराच्या विविध भागात विकसित भारत संकल्प यात्रेची फिरती गाडी फिरवली जाणार आहे. या वाहनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या जनहिताच्या अनेक योजनांची माहिती जनसामान्यांना दिली जाणार आहे. गेल्या बुधवारी कल्याण पूर्वेतील ड प्रभाग कार्यालया समोरील मैदानात संकल्प यात्रेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय सहसचिव बसंत गर्ग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला सामान्यांची अधिक संख्येने उपस्थिती नव्हती. मांडण्यात आलेल्या खुर्च्या रिकाम्या, त्यावर धूळ होती. व्यासपीठावर मांडण्यात आलेल्या खुर्चीवर धूळ असल्याने ती साफ करून सहसचिव गर्ग यांना आसनस्थ व्हावे लागले. हा सगळा प्रकार आयुक्त जाखड यांच्या समक्ष झाला. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्रीय विकास योजनांची माहिती देणाऱ्या वाहनाचा एलईडी पडदा बराच वेळ झाला तरी सुरू होत नव्हता. या सर्व कार्यक्रमाची पाहुणे येण्यापूर्वी रंगीत तालीम करून घेणे हे समन्वयक उपायुक्त धर्येशील जाधव, समाज विकास विभागाचे काम होते. जाधव यांच्यासह समाज विकास विभागाने या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष केले.

या कार्यक्रमातील ढिसाळ नियोजन पाहून आणि या सर्व प्रकाराबद्दल सहसचिव गर्ग यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्याने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड संतप्त झाल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर मात्र आयुक्त जाखड यांनी उपायुक्त जाधव यांची हजेरी घेतली. स्वताच्या स्वाक्षरीने संकल्प यात्रेतील ढिसाळ नियोजनाबद्दल उपायुक्त जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावून आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, असा इशारा दिला. तीन दिवसात जाधव यांनी या नोटिसीला उत्तर दिले नाहीतर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी अशाप्रकारची नोटीस उपायुक्त जाधव यांना दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bad planning of the evolved bharat yojana program in kalyan mrj

First published on: 09-12-2023 at 15:30 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा