लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या मुरबाड रस्त्यावरील सिंडीगेट येथील कार्यशाळेला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. आगीत कार्यशाळेत दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या दोन बस जळून खाक झाल्या. कार्यशाळा इमारतीचे आगीत नुकसान झाले.
आगीची माहिती मिळताच पालिका अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आग विझविण्याचे काम सुरू केले. या कार्यशाळेच्या बाजुला बसमध्ये डिझेल भरण्याच्या भुयारी टाक्या होत्या. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यशाळेच्या चारही बाजुने पाणी मारण्यात येऊन आग इतरत्र पसरणार नाही याची काळजी घेण्यात आली.
आणखी वाचा-केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा मीरा रोड येथून ‘विकसित भारत संकल्प जोडो’ यात्रेत सहभाग
कार्यशाळेत दुरुस्तीच्या कामामुळे इंधनाचा वापर असतो. आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी काढला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.