बदलापूर: पूर्व मोसमी पावसाचा फटका सोमवारी बदलापूर शहराला बसला. पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या तुफान पावसाने बदलापूर शहराला झोडपून काढले. अवघ्या चार तासात १६० मिलिमीटर पावसाची नोंद खासगी हवामान अभ्यासकांनी केली. बदलापूर रेल्वे स्थानकात साडे आठच्या सुमारास रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. तर विजेच्या कडकडाटामुळे बदलापूरसह अंबरनाथ आणि आसपासच्या शहरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाल्याने पूर्व मोसमी पावसानेही लवकर हजेरी लावली. त्यामुळे संपूर्ण मे महिना कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेक नियोजित कामे, प्रशासकीय कामे आणि लग्न समारंभांवर पाणी फिरले आहे. अशातच सोमवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता.

त्यानुसार सोमवारी पहाटेपासूनच ठाणे जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस कोसळला. पहाटे साडेचार वाजल्यापासून विजांचा कडकडाट सुरू होता. वेगाने वारे वाहत होते आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. बदलापूर शहरात पहाटे पाच वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत तब्बल १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी त्यांच्या केंद्रात ही नोंद केली. तर याच काळात अवघ्या वीस मिनिटात ५० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. त्यावरून पावसाची तीव्रता कळू शकते अशी माहिती मोडक यांनी दिली आहे. अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरातही असाच विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. पुढे उल्हासनगर, कल्याणकडे या पावसाचा जोर काही अंशी कमी होता. तर मुरबाड, भीमाशंकर, कर्जत या भागात असाच पाऊस कोसळत होता. भीमाशंकर येथे याच काळात ३२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती मोडक यांनी दिली आहे.

या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत काही अंशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र अद्याप पूरस्थिती सारखी परिस्थिती नाही. बदलापूर रेल्वे स्थानकात या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचे दिसून आले. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा पाच ते दहा मिनिटे उशिराने सुरू होती.