लोकसत्ता प्रतिनिधी
बदलापूर : बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक एकला कुंपण घातले जाणार असून या कामानंतर होम फलाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलाट क्रमांक एक अ हा फलाट क्रमांक एक म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकातील होम फलाट इतिहासजमा होणार असे मानले जाते. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे स्थानिक राजकारण्यांनी होम फलाटाचे आश्वासन देऊन मते मिळवली. हा होम फलाट पूर्ण होण्यापूर्वीच इतिहासजमा होणार असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आता अस्तित्वात राहणार नाही. मध्य रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात शनिवार आणि रविवारी मध्य रात्री विशेष ब्लॉक नियोजीत केला आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मध्य रेल्वे अतिक्रमण नियंत्रण उपायांचा एक भाग म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर कुंपण घालण्याचे काम करणार आहे. हे काम सुलभ व्हावे म्हणऊन फलाक क्रमांक एकवर रात्रीचा विशेष वाहतूक ब्लॉक घेतला जातो आहे. हा ब्लॉक शनिवार १९ एप्रिल, रविवार, २० एप्रिल रोजी रात्री १२ ते ६ वाजेपर्यंत सहा तासांचा असेल.
हा ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर बदलापूर येथील विद्यमान फलाट क्रमांक १ कायमचा बंद केला जाईल. तेच सध्याचा होम फलाट म्हणून परिचीत असलेला फलाट क्रमांक १ अ हा फलाट क्रमांक १ म्हणून नियुक्त केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकातील होम फलाट अल्पजीवी ठरणार असून तो इतिहासजमा होणार आहे.
सध्या परिस्थिती काय
बदलापूर रेल्वे स्थानकात होम फलाटाची उभारणी करण्यात आली असून फलाट १ आणि १ अ वरून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे आणि मुंबई दिशेच्या स्थानकांसाठी लोकल गाड्या सुटतात. फलाट क्रमांक १ आणि २ हा संयुक्त फलाट असून येथे मुंबईकडे जाणाऱ्या आणि कर्जत, खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल येत होत्या. येथे एकाच वेळी दोन गाड्या आल्यास गर्दी होत होती. म्हणून याठिकाणी होम फलाट उभारावी अशी प्रवाशांची मागणी होती. तसा तो उभारण्यात आला. गेल्या वर्षात लोकसभा निवडणुकांपूर्वी अपूर्णावस्थेत असलेल्या होम फलाटाचे घाईघाईट उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यावरील रंगरंगोटी, छप्पराचे काम केले गेले. अजुनही येथे डेकचे काम सुरू आहे.
होम फलाट अल्पजीवी ?
बदलापूर रेल्वे स्थानकात होम फलाटात लोकल आल्यानंतर गर्दी फलाट क्रमांक १ आणि १ अ वर विभागली जात होती. पश्चिमेकडे जाणारे प्रवासी फलाट क्रमांक १ अ, तर पूर्वेकडील प्रवासी फलाट क्रमांक १ वर उतरून जात होते. आता मुंबईकडून येणाऱ्या बदलापूर लोकलची गर्दी फलाट क्रमांक १ अ किंवा २ वर होईल. पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण होणार अशी भीती व्यक्त केली जाते आहे.