डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील देवी चौकात भागातील राम मंदिर रस्त्यावरील लक्ष्मी सोहम सोसायटीच्या गाळ्यात पान टपरी चालविणाऱ्या एका पान टपरी चालकाच्या गाळ्यातून विष्णुनगर पोलिसांच्या पथकाने ५६ हजार रूपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. काही महिन्यापूर्वी पोलीस आणि महापालिकेने विष्णुनगरमधील स्वामी विवेकानंद शाळेसमोरील एका पान टपरी दुकानातून लाखो रूपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला होता.
प्रतिबंधित गुटखा विक्री करणारे बहुतांशी घाऊक आणि किरकोळ व्रिक्रेते हे परप्रांतीय असल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे. गेल्या वर्षभरात डोंबिवली, कल्याण शहरात केलेल्या कारवायांमध्ये प्रतिबंधिक गुटखा विक्री करणारे हे परप्रांतीय असल्याचे उघड झाले होते.
विष्णुनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोखंडे यांना गुप्त माहितगारामार्फत माहिती मिळाली की डोंबिवली पश्चिमेतील देवीचौकातील लक्ष्मी सोहम इमारतीच्या गाळ्यात एक विक्रेता दीपक पान टपरी नावाने पान विक्रीचा व्यवसाय करतो. हा पान टपरी चालक अधिक प्रमाणात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मसाला चोरून ग्राहकांना विकत आहे. हा प्रतिबंधित गुटखा खरेदीसाठी ग्राहकांची अधिक प्रमाणात गर्दी असते. या माहितीची साहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी खात्री पटवून घेतली. त्यावेळी पान टपरी चालक प्रतिबंधित गुटखा विक्री करत असल्याचे पोलिसांना समजले.
पोलिसांनी या पान टपरीवर अचानक छापा मारण्याची तयारी केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक लोखंडे, हवालदार तरे, बोडके, भांगरे, विसपुते, थोरात यांनी रविवारी देवी चौकातील राम मंदिर रस्त्यावरील लक्ष्मी सोहम सोसायटीतील दीपक पान टपरी दुकानात छापा टाकला. मनोजकुमार जगदीशप्रसाद गुप्ता (४४) असे नाव त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी त्याच्या दुकानाची झडती घेतली. दुकानात पोलिसांना केसरयुक्त सुगंधित पान मसाला, बाजीराव सुगंधित पानमसाला,राज कोल्हापुरी, आनंद चूर्ण, महाकाल वट्टी, किर कोकील, गुलाब भाजकी, महक चैनी, आनंद मुनक्का, जगत तंबाखु अशा विविध प्रकारच्या शासनाने विक्रीसाठी प्रतिबंध केलेल्या पान मसाल्याच्या पुड्या दुकानात आढळून आल्या. हा प्रतिबंधत साठा पाहून पोलीस चक्रावून गेले.
ही कारवाई सुरू झाल्यानंतर परिसरातील पान टपरी दुकान मालक दुकाने बंद करून पळून गेले. पोलिसांनी दुकानातून ५६ हजार रूपये किमतीचा साठा जप्त केला. हा प्रतिबंधक पान मसाला तु कोठून आणला आहे याची माहिती पोलीस मनोजकुमार गुप्ताकडून काढत होते. पण तो माहिती देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर पोलिसांनी त्याच्या दुकानातील प्रतिबंधित साठा जप्त केला. त्याच्या विरुध्द अन्न आणि सुरक्षा कायद्याने गुन्हा दाखल केला.