ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर उभारण्यात आलेल्या भाईंदर पाडा उड्डाण पुलाचे लोकार्पण बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेला हा पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला असून या पुलामुळे घोडबंदर मार्गावरील प्रवास काहीसा वेगवान झाला आहे. याशिवाय, या पुलाखाली दोन भुयारी मार्गिका तयार करण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांना वाहनाद्वारे रस्ता ओलांडणे शक्य होणार आहे.

ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरीवली, वसई, विरार आणि गुजरातच्या दिशेने हजारो वाहने वाहतुक करतात. तसेच वसई भागातील नोकरदार देखील घोडबंदर रस्ते मार्गे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करतात. उरण जेएनपीटी बंदरातून गुजरातला जाणारी अवजड वाहने देखील घोडबंदर मार्गेच जातात. त्यामुळे या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावर घोडबंदर भागातील अनेक अंतर्गत रस्ते जोडण्यात आलेले असून याठिकाणी मोठी लोकवस्ती आहे.

या नागरिकांना महामार्गावरून रस्ता ओलांडता यावा आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी या मार्गावर यापुर्वीच उड्डाणपुल उभारण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कापुरबावडी, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ या उड्डाणपुलांचा समावेश आहे. असे असले तरी वाघबीळच्या पुढे असलेल्या आनंदनगर, कासारवडवली, भाईंदर पाडा, गायमुख या भागातही गेल्या काही वर्षात मोठी गृहसंकुले उभी राहिली असून या भागांचेही मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागातील नागरिकांना महामार्गावरून वळण घेऊन अंतर्गत मार्गावर जाताना तारेवरची कसरत करावी लागत होती.

वाहने रस्ता ओलांडत असल्याने महामार्गावरील वाहतूक रोखून धरली जात होती. यामुळे कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्यावर मात करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भाईंदर पाडा आणि कासारवडवली येथे उड्डाण पुल उभारण्याचा निर्णय घेतला होता. या मार्गाच्या मध्यभागातून मेट्रो मार्गिका जात असून त्याचखाली समांतर पद्धतीने हे उड्डाणपुल उभारण्यात येत आहे. त्यापैकी भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे काम काही दिवसांपुर्वीच पुर्ण झाले होते.

हा पुल उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याचे वृत्त लोकसत्ता सह दैनिकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्तानंतर बुधवारी या पुलाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

असा आहे पुल

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भाईंदरपाडा हा पुल उभारलेला आहे. हा उड्डाणपुल एकूण ६०१ मीटऱचा आहे. त्याचे ठाणे बाजुकडील टोक ३९१.४८ मीटर आणि बोरिवली बाजूकडील टोक १८९.८८ मीटर तर, भुयारी मार्गाचा भाग २०.४ मीटरचा आहे. या पुलावर ७.५ मीटरच्या प्रत्येकी दोन मार्गिका आहेत. भुयारी मार्गावरही प्रत्येकी दोन मार्गिका आणि एक मीटरचा पदपथ तयार करण्यात आलेला आहे.

या पुलाच्या कामासाठी ३४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्थानिक रहिवाशांना पुलाखालील भुयारी मार्गातून अंतर्गत मार्गांवर जाता येणार आहे. यामुळे यापुर्वी स्थानिक रहिवाशांची वाहने रस्ता ओलांडताना घोडबंदर मार्गावर जी वाहतूक रोखून धरावी लागत होती. ती आता रोखून धरावी लागणार नसून ही वाहने थेट पुलावरून न थांबता प्रवास करणार आहेत. यामुळे प्रवास कालावधी कमी होणार आहे, असा दावा करण्यात येत आहे.