कल्याण : भाजपच्या औषध विक्रेता विभागातर्फे येत्या मंगळवारपासून राज्यभर सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने राज्यभर विविध भागात सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती भाजप औषध विक्रेता विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दुबे यांनी दिली. या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी आयोजित प्रदेश कार्यालयातील बैठकीला प्रदेश समन्वयक अजित पारख, राज्याच्या विविध भागातील औषध विक्रेता संघटनांचे प्रतिनिधी डोंबिवलीतून नीलेश वाणी, इतर भागांमधून सुनील भंगाळे, अतुल अहिरे, दीपक कोठारी, गोपाळ गांधी उपस्थित होते.

सेवा सप्ताह तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वृध्दाश्रम, अनाथ आश्रमातील नागरिक, मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी डाॅक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना औषधे देण्यात येणार आहेत. रक्तदान शिबीरांचे आयोजन करून ते रक्त रक्तपेढ्यांना देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विकलांग मुलींनी तयार केलेल्या घरगुती वस्तुंना शहरी बाजारपेठ मिळवून देणे. या वस्तूंच्या माध्यमातून अशा मुली, त्यांच्या संस्थांना आर्थिक मदत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.याशिवाय वृक्षारोपणाचे उपक्रम हाती घेऊन हे वृक्ष पूर्ण वाढ होईपर्यंत प्रत्येकाने दत्तक घ्यावेत याचे नियोजन केले गेले आहे. अनेक वेळा शीत शवपेट्या वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विभागवार अशा शीत शवपेट्यांची माहिती घेऊन संख्या कमी असलेल्या भागात त्या पेट्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, असे नीलेश वाणी यांनी सांगितले.

तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात राज्यात अधिक संख्येने औषध मिश्रक आहेत. काहींनी स्वताच्या क्षमतेने औषध विक्री दुकाने काढली आहेत. काहींची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते बेरोजगार आहेत. काही औषध दुकानांमध्ये साहाय्यक म्हणून काम करत आहेत. अशा औषध मिश्रकांची बेरोजगार असलेली मोठी फळी राज्यात आहे. अशा बेरोजगार औषध मिश्रकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई, पुणे येथे हे रोजगार मेळावे भरविण्याचे नियोजन सुरू आहे, असे प्रदेशाध्यक्ष दुबे यांनी सांगितले. विजय पाटील यांनी औषध मिश्रक रोजगार मेळाव्याची संकल्पना मांडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विविध समाजपयोगी उपक्रम आणि संस्था चालविल्या जातात. त्या संस्थांना या कालावधीत मोफत औषध देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.