ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांचा संताप वाढू लागल्याने बुधवारी भाजपने कळवा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवला. तसेच दहा दिवसांत पाणी प्रश्न सुटला नाही, तर पालिका अधिकाऱ्यांना कार्यालयात बसणे मुश्किल होईल, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला.
कळव्यातील विक्रम नगर, मनीषा नगर, रेल्वे कॉलनी, मच्छी मार्केट, शंकर मंदिर, टाकोळी मोहल्ला, आई नगर, कळवा पूर्व या भागात पाणी टंचाई जाणवत आहे. यामुळे कळव्यातील भाजपचे पदाधिकारी आणि माजी उपमहापौर अशोक भोईर यांनी बुधवारी कळवा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून महिलांनी भाजपच्या मोर्च्यात सहभागी होऊन आक्रोश व्यक्त केला. “मडक्यात पाणी नाही आणि महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे कळवेकर त्रस्त झाले आहेत,” असे नागरिकांनी सांगितले. यावेळी महिलांनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवला. तसेच प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. कावेरी सेतू येथून कळवा प्रभाग समिती कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता.
पाणी प्रश्न हा कळवेकर नागरिकांचा आहे, कुठल्या पक्षाचा हा प्रश्न नाही. महापालिकेच्या नियोजनाअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. प्रश्न सोडवला नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी नागरिकांनी प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयात जायचे का, पाण्यासाठीही न्यायालयात जायांचे का, असा सवाल आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केला. महापालिका केवळ निवेदन घेण्यासाठी नाही तर प्रश्न सोडवण्यासाठी आहे. दहा दिवसांत ठोस नियोजन झाले नाही तर नागरिकांचा संताप कसा उग्र होईल याची पालिकेला जाणीव करून दिली जाईल आणि पालिका अधिकाऱ्यांना कार्यालयात बसणे मुश्किल होईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कळवा पूर्वेला पाणी टाकी असूनही त्यात पाणी नाही. टाक्यांना गळती असून प्रशासनाचे नियोजन चुकले आहे. एका भागाला पाणी देऊन दुसऱ्या भागाला वंचित ठेवणे, ही भूमिका खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर भाजप कार्यकर्त्यांना कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा आमदार निरंजन डावखरे यांनी दिला.