आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबतच लढविणार आहोत. असे असले तरी राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये युती करायची की नाही हे स्थानिक पातळीवरील पक्ष समितीच्या चर्चेनंतरच ठरविले जाईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा- सोशल मीडियावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बदनामी; डोंबिवलीतील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनात्मक बांधणीसाठी शनिवारी ठाणे शहराचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता असून या निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजपा युती करणार का याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असून या संबंधीच्या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे यांनी सावध प्रतिक्रीया दिली. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबतच लढविणार आहोत. पण, महापालिका निवडणुकांमध्ये युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरील समिती घेऊन तसे प्रदेश स्तरावर कळवते. त्यानुसार प्रदेश पातळीवरून युतीबाबतचे निर्णय जाहीर केले जातात. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील समितीच्या चर्चेनंतरच युतीचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका स्मार्ट सिटी तसेच इतर घोटाळ्यांबाबत पक्षाच्या नेत्यांनी आवाज उठविल्यानंतर चौकशी सुरु झाली, हे खरे आहे. पण, राज्यात सत्ता बदलानंतर त्या चौकशांची नस्ती अद्याप बंद झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- भिवंडीत १८ महिन्याच्या बालकाच्या मृत्यूप्रकरणी पालिका उपअभियंता, ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादीने कपट कारस्थान करून उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे त्यांच्याकडे केले. पण, राज्यात आता त्यांचा दिवा पेटणार नाही. शरद पवार यांच्या जाळ्यात उद्धव ठाकरे हे अडकले. त्यांनी स्वत:च्या पक्षातील आमदारांचा विचार केला नाही आणि त्याचबरोबर विचारांनाही मुठमाती दिली. आपला पुत्र आणि आपण या मोहापायी त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, अशी टिकाही त्यांनी केली. राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकार पडेल, अशी विधाने राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. पण, आपल्या पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अशी विधाने केली जात आहेत, असेही ते म्हणाले. उद्योजकांना तीन ते चार तासांचा वेळ द्यावा लागतो. पण, गेल्या दोन वर्षात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात आलेच नाहीत. त्यामुळेच उद्योग राज्याबाहेर गेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शिंदे आणि फडणवीस सरकार चांगले काम करीत असून हे सरकार गेल्या अडीच वर्षात झालेले नुकसान भरून काढेलच पण त्याचबरोबर पुढील दोन वर्षांची विकास कामेही करेल. या सरकारला आम्ही संघटनेच्या माध्यमातून बळ देण्याचे काम करणार आहोत, असेही ते म्हणाले.

उमेदवार मिळणार नाहीत

२०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपुर्वीच मोठे राजकीय बाॅम्बस्फोट झाल्याचे दिसून येईल. महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करतील. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांना निवडणुकीत उमेदवार मिळणार नाहीत, या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहेत, असेही बावनकु‌ळे यांनी सांगितले. महाविकास आघाडीप्रमाणेच शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छूक असतील तर त्यांना प्रवेश देणार का, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी पक्षवाढीसाठी कुणालाही प्रवेश देऊ असे स्पष्ट केले.