अंबरनाथ : अंबरनाथ शहरात गेल्या काही महिन्यांपासून पथदिवे बंद पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अंधारात रस्ते पार करण्यास भाग पडत असून, वाहतूक अपघात आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार होत आहे. या गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने (भाजप) केला आहे.

नुकताच काढलेल्या ‘आक्रोश मोर्चा’नंतरही ठोस उपाययोजना न झाल्याने भाजपकडून आता आणखी तीव्र भूमिका घेण्यात आली आहे. पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी येत्या २५ सप्टेंबर रोजी नगरपालिका कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

अंबरनाथ शहरातील पथदिवे बंद पडल्यामुळे रात्रीच्या वेळेस अनेक भाग अंधारात बुडतात. केवळ अपघातच नव्हे तर चोरट्यांना, समाजकंटकांना संधी मिळत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच शहरातील मुख्य रस्त्यांपासून गल्ल्यापर्यंत खड्ड्यांनी विदारक अवस्था केली आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र ते पूर्ण झाले नाही. याशिवाय कचऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे.

ठेकेदाराला बिले, पण दिवे बंदच!

भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले यांनी पत्रकार परिषदेत पालिकेवर थेट आरोप केले. नागरिकांकडून कर वसूल करूनही त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग केला जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पथदिव्यांची देखभाल करण्यासाठी ठेकेदाराला पालिकेकडून करोडो रुपयांची बिले अदा करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात हजारो दिवे बंदच आहेत. करदात्यांचा पैसा वाया घालवून नागरिकांना अंधारात ढकलणारे प्रशासन जबाबदार असल्याचे करंजुले यांनी म्हटले.

आक्रोश मोर्चानंतरही उदासीनता

याआधी भाजपने नागरिकांच्या समस्या अधोरेखित करण्यासाठी ‘आक्रोश मोर्चा’ काढला होता. त्यावेळीही पथदिवे, खड्डेमय रस्ते, कचरा व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर भाजपने प्रशासनाला जाब विचारला होता. मात्र त्यातून कोणताही ठोस निर्णय किंवा कारवाई झाली नाही. उलट नागरिकांना वारंवार आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली, असा आरोप करण्यात आला.

२५ सप्टेंबरला टाळे ठोका आंदोलन

नागरिकांच्या समस्या सोडविण्याबाबत पालिका गांभीर्य दाखवत नसल्याने भाजप आता आक्रमक झाला आहे. २५ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढून अंबरनाथ नगरपालिका कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशारा भाजपने दिला आहे. या आंदोलनाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास करंजुले यांनी व्यक्त केला.

अंबरनाथ शहरातील वाढत्या समस्यांनी नागरिकांचे हाल होत असताना, राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडूनच आक्रमक पवित्रा घेतल्याने आगामी काळात नगरपालिकेतील राजकारण तापण्याची शक्यता आहे. पथदिवे सुरू होणे, खड्डे बुजवणे आणि कचरा प्रश्न सोडवणे या तातडीच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास भाजपला आगामी पालिका निवडणुकांसाठी आयते कोलीत मिळणार आहे.