ठाणे : तान्ह्या मुलांसह रेल्वेप्रवास करणाऱ्या मातांसाठी उपयुक्त असलेल्या ममता कक्षांची दुरवस्था झाली आहे. ठाणे स्थानकात दिवसभरात दोन ते तीनदा स्वच्छता केली जात असूनही मध्य रेल्वेच्या दुर्लक्षामुळे कक्षाची धूळधाण उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे स्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करतात. कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ, बदलापूर टिटवाळा कसाऱ्याकडील स्तनदा मातांची रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाने ममता कक्ष उभारला आहे. या कक्षात स्तनदा मातांसाठी एक आसन आणि पंख्याची सोय केली आहे. स्थानक परिसराची दिवसभरात तीनदा स्वच्छता केली जाते, मात्र त्यातून ममता कक्ष का वगळला जात आहे, असा सवाल प्रवाशांनी केला आहे. कक्षात धूळ आहे. शिवाय प्लास्टिकचा कचराही पसरला आहे. अस्वच्छतेमुळे स्तनदा माता कक्षात जात नाहीत. दोन क्रमांकाच्या फलाटावर अडगळीच्या ठिकाणी हा कक्ष उभारण्यात आल्याने तो प्रवाशांच्या निदर्शनास येत नसल्याच्या तक्रारी काही प्रवाशांनी केल्या आहेत.

तान्ह्या मुलासह काही महिला प्रवास करतात. स्तनदा मातांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ममता कक्ष उभारले आहेत, मात्र ठाणे स्थानकातील ममता कक्षाच्या दुर्दशेमुळे तेथे बसण्यास कुणी तयार नसते. याशिवाय महिला सुरक्षिततेचा मुद्दाही महत्त्वाचा असून कक्षाविषयी माहिती देणारा फलक लावण्याची सूचना उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष लता अरगडे यांनी केली आहे.

स्थानकात दिवसातून तीनदा स्वच्छता होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र यात ममता कक्षाच्या धूळधाणीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत.

ममता कक्ष अस्वच्छतेबाबत निरीक्षण करून आवश्यकता असल्यास देखभाल तसेच स्वच्छता राखण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. – पी. डी. पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

ममता कक्षात स्तनदा मातांना बसण्याची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे विद्युत दिवा तसेच पंख्यांची देखिल व्यवस्था आहे.

सद्यास्थिती काय ?

ठाणे रेल्वे स्थानकात दिवसाला दोन ते तीन वेळा स्वच्छता केली जाते. मात्र याच परिसरात स्थानकातील फलाट दोन शेजारी हे ममता कक्ष आहे. या ममता कक्षात प्लॅस्टिक तसेच इतर कचरा असल्याचे दिसून येते. तसेच कक्षात मोठ्या प्रमाणावर धूळ असल्याचे दिसून येते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breastfeeding pods mamata kaksha at thane railway station neglected by railway asj