ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे श्रीकांत शिंदे यांच्या संपत्तीमध्ये २०१९ च्या तुलनेत १३ कोटींनी वाढ झाली आहे. त्यांच्या आणि पत्नीच्या नावावर स्थावर आणि जंगम अशी एकूण १४ कोटी ४३ लाख ८० हजार ७९० रुपयांची मालमत्ता आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांची मालमत्ता १ कोटी ६७ लाख ५९ हजार ५१५ इतकी होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

* एकूण संपत्ती – १४,४३,८०,७९० (२०१९ मध्ये १,६७,५९,५१५)

* रोख रक्कम – ३,९९,०२१ पत्नीकडे – १,४१,४५२

* जंगम – ४,७९,६४,९२७ पत्नीकडे – ३,३५,४३,८८५

* स्थावर – २,३४,५४,००० पत्नीकडे – ३,९४,१७,९७८

* कर्ज – १,७७,३६,५५० पत्नीकडे – ४,८५,८३,८९३

* दागिने – त्यांच्याकडे ११ लाख ३४ हजार ५२९ रुपयांचे सोने, ४ लाख ९७ हजार १३७ रुपयांची हिऱ्याची अंगठी, १ लाख १० हजार ५०० रुपयांचे दोन घडयाळे आहेत. पत्नीकडे २२ लाख ८२ हजार ७२५ रुपयांचे सोने, ७ लाख ५६ हजार रुपयांची हिऱ्याची अंगठी, १ लाख ६३ हजार ८७२ रुपयांचे चांदीचे दागिने आणि ३ लाख ४४ हजार १७ रुपयांचे दोन घडयाळे आहेत.

* वाहने – नाही 

* शेती – श्रीकांत शिंदे यांच्या नावे सातारा जिल्ह्यातील दरे गावात तर, पत्नी वृषाली शिंदे यांच्या नावे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात असलेल्या हुमरमाळा गावात शेतजमीन आहे. ’ सदनिका -पत्नीच्या नावे ठाण्यातील पाचपाखाडी येथे देव अशोका, कळवा येथे इंद्रायणी को-ऑप. सोसायटी, ठाण्यातील रहेजा गार्डन येथे अ‍ॅस्कोना अमाल्फी येथे सदनिका आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत शक्तिप्रदर्शन करत श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवीन जिंदाल यांची एक हजार कोटींची संपत्ती

चंदिगड : हरियाणातील कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांची स्थावर आणि जंगम अशी मिळून एक हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे.  ५४ वर्षीय जिंदाल यांनी गुरुवारी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात संपत्ती जाहीर केली. जिंदाल दाम्पत्याकडे ४० कोटींचे दागिने असले तरी त्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून त्यांनी ‘एमबीए’ पदवी प्राप्त केली आहे.

डॉ. भारती पवार यांच्या मालमत्तेत दुप्पट वाढ

नाशिक : दिंडोरी मतदार संघातील भाजपच्या उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची कौटुंबिक मालमत्ता पाच वर्षांत दुप्पट झाली आहे.  पवार कुटुंबियांकडे ११ लाख रुपयांचे १५५ ग्रॅम सोन्याचे दागिने तर एक लाख आठ हजार रुपयांची १.३५ किलो चांदी आहे.  डॉ. भारती पवार यांच्यापेक्षा त्यांचे पती प्रवीण हे अधिक श्रीमंत आहेत. पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये डॉ. पवार कुटुंबियांची एकूण संपत्ती १२ कोटी २५ लाखाची होती. आता ती जवळपास २३ कोटींच्या घरात गेली आहे. पाच वर्षांपूर्वी या कुटुंबाची एक कोटी ३५ लाखाची चल आणि १० कोटी ९० लाखाची अचल संपत्ती होती.

अमोल कीर्तिकर यांची ११ कोटींची मालमत्ता

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी (शिवसेना)चे उमेदवार अमोल कीर्तिकर ११ कोटींचे धनी असून त्यांच्याकडे तब्बल ५३ एकर शेतजमीन आहे.

* एकूण मालमत्ता : सुमारे ११ कोटी ७७ लाख.

* जंगम मालमत्ता: दोन कोटी ४४ लाख. यात कीर्तिकर दोन कोटी तर पत्नी आणि मुलांची ४४ लाखांची मालमत्ता. ७५ तोळे सोन्याचे दागिने, बँकेतील ठेवी, वित्तीय संस्थांमधील गुंतणुकीचा समावेश आहे. तसेच २० लाखांची टोयोटा गाडी आहे.

* स्थावर मालमत्ता : सुमारे नऊ कोटी ३३ लाख. रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यात एक कोटी ९८ लाख रुपये किमतीची ५३ एकर शेतजमीन. मुंबईत पहाडी गोरेगाव येथे ६८२ चौरस मीटर जागा असून त्याची किंमत एक कोटी ९० लाख.  याशिवाय दिंडोशी, गोरेगाव आदी ठिकाणी कोटयवधी रुपये किमतीच्या निवासी आणि व्यापारी जागा असून वारसा हक्काने दोन कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता मिळालेली आहे.

*  कर्जे:  अमोल कीर्तिकर यांच्यावर विविध वित्तीय संस्थांचे एक कोटी, ५५ लाखांचे कर्ज आहे.

काँग्रेसचे भूषण पाटील २० कोटींचे धनी

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी(काँग्रेस)चे उमेदवार भूषण पाटील २० कोटींचे धनी असून त्यांच्याकडे तब्बल सव्वा किलो सोन्याचे दागिने आहेत.

*  एकूण मालमत्ता : सुमारे २० कोटी ७४ लाख.

*  जंगम मालमत्ता : पाच कोटी ४६ लाख. यात पाटील यांची तीन कोटी ८१ लाख तर पत्नीची एक कोटी ६४ लाख. यामध्ये सव्वा तोळे सोन्याचे दागिने, बँकेतील ठेवी, वित्तीय संस्थांमधील गुंतणुकीचा समावेश आहे. तसेच पाटील यांच्याकडे एक कोटी १२ लाखांची बीएमडब्लू आणि ५५ लाखांची मर्सिडीज बेन्झ अशा महागडया गाडया आहेत.

*  स्थावर मालमत्ता: सुमारे १५ कोटी २८ लाख. डहाणू येथे शेतजमीन, गोराई, कांदिवली, बोरीवली आदी ठिकाणी लाखो रुपये किमतीच्या निवासी आणि व्यापारी मालमत्ता. *  कर्जे: भूषण पाटील यांच्यावर विविध वित्तीय संस्था तसेच खासगी व्यक्तीकडून घेतलेले एकूण चार कोटी, १८ लाख तर पत्नीवर एक कोटी, ६६ लाखांचे कर्ज आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidate affidavits for lok sabha elections shrikant shinde assets grow by 13 crore zws