ठाणे : गॅस वाहिनीने पुरवठा करणाऱ्या वाहिनीचे नुकसान झाल्याने रविवारपासून सीएनजी गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. ठाण्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधा-शोध सुरु होती. अनेक सीएनजी पंपावर रविवारी रात्री रिक्षा चालकांच्या एक ते दीड किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. सीएनजी नसल्याने रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकल्या नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.
गेल्याकाही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात वाहने सीएनजीवर धावत आहेत. ठाण्यात टीएमटीची सार्वजनिक वाहतुक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नाही. त्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक शेअर रिक्षा किंवा मीटरच्या रिक्षाने वाहतुकीचा पर्याय निवडतात. या सर्व रिक्षा सीएनजी इंधनावर धावणाऱ्या आहेत. तर अनेक कारमध्ये देखील सीएनजी बसविण्यात आल्या आहेत.
सीएनजीचा पुरवठा प्रभावित झाल्याने अनेक रविवारी सीएनजी पंपवर इंधन पुरेसे उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे रिक्षा चालक तसेच इतर वाहन चालकांची सीएनजी पंपवर इंधन मिळावे यासाठी अक्षरश: शोधाशोध सुरु होती. ठाण्यातील काही सीएनजी पंपवर एक ते दीड किमी पर्यंत रांगा लागल्याचे चित्र होते. सीएनजी उपलब्ध न झाल्याने रिक्षा चालकांचा दैनंदिन व्यवसाय बुडाला. तर नागरिकांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध न झाल्याने त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. बसथांब्यांवरही प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसत होती.
नेमके काय झाले आहे
– राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर (आरसीएफ) कंपाऊंडमधील गॅस अथाॅरिटी ऑफ इंडिया (गेल) मुख्य गॅस पुरवठा वाहिनीमध्ये नुकसान झाले. त्याचा परिणाम महानगर कंपनीच्या सीटी गेट स्टेशनच्या (सीजीएस) गॅस पुरवठ्यावर झाला. त्यामुळे सीएनजी इंधनाचा तुडवडा झाला. त्याचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील विविध सीएनजी पंपवर दिसून आला.
व्यवयावर परिणाम – याबाबत ठाण्यातील रिक्षा चालक संजय चव्हाण यांना विचारले असता, काल संध्याकाळपासूनच ठाणे शहरातील सर्चच सीएनजी पंपवर भली मोठी रांग होती. दोन ते तीन तास सीएनजी पंपवर प्रतिक्षा करावी लागली. त्यामुळे वेळचे आणि आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
