नारळी पौर्णिमेनिमित्ताने कळवा येथील खाडीजवळ विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी कळवा पूलावर होत असते. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून गुरुवारी सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत ठाणे शहरात वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत कळवा पूल वाहतूकीसाठी बंद असणार आहे. येथील वाहतूक कोर्टनाका, पूर्व द्रुतगती महामार्ग, साकेत पूल मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कळवा येथील कळवा खाडी परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्ताने कोळी समाजाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. करोनामुळे मागील दोनवर्ष येथे साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला गेला. आता करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याचे चित्र असून उत्सव साजरा करण्यासाठी मोठी गर्दी या भागात होण्याची शक्यता आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून येथील वाहतूक बदल करून वाहतूक पर्यायी मार्गे वळविली आहे. गुरुवारी सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे बदल लागू करण्यात आले आहे.

वाहतूक बदल पुढील प्रमाणे
कळवा पूल येथून उर्जिता उपाहारगृहमार्गे कोर्टनाका आणि सिडकोच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृह येथे प्रवशबंदी असेल. येथील वाहने उर्जिता उपाहारगृह येथून कारागृह वसाहत, आरटीओ कार्यालयासमोरून जीपीओ येथून इच्छितस्थळी जातील.

सिडको येथून कळवा नाक्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथून अे-वन फर्निचर दुकान मार्गे जातील.

साकेत रस्ता येथून सिडकोच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या ठाणे आणि नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसगाड्यांना (टीएमटी आणि एनएमएमटी) खाडी पूलाच्या दिशेने वाहतूक करण्यास राबोडी वाहतूक उपविभागीय कार्यालयाजवळ प्रवेशबंदी आहे. येथील वाहने विभागाच्या कार्यालयाजवळून फिरून पुन्हा साकेत मार्गे जातील.

नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसगाड्या आणि खासगी कंपन्यांच्या बसगाड्यांना कळवा पूल मार्गे सिडको बसथांबा किंवा ठाण्याच्या दिशेने वाहतूक करण्यास पटनी येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने पटनी येथे प्रवाशांना उतरवून तेथून मागे वळतील. तसेच एसटी बसगाड्या या खोपट एसटी वर्कशाॅप येथून प्रवाशांची वाहतूक करून आनंदनगर जकातनाका मार्गे जातील.

ठाण्याहून कळवा पूल मार्गे नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्या, खासगी बसगाड्यांना कॅडबरी सिग्नल, खोपट येथून प्रवेशबंदी असेल. येथील वाहने पूर्व द्रुतगती महामार्गे, गोल्डन डाईज नाका, पारसिक नाका मार्गे वाहतूक करतील.

गोल्डन डाईज नाका, जीपीओ मार्गे कळवा खाडी पूलाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चारचाकी तसेच जड वाहनांना गोल्डन डाईज नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कोपरी पूल, आनंदनगर नाका मार्गे किंवा साकेत पूल मार्गे वाहतूक करतील.

कळवा, विटावा जकातनाका, पारसिक चौक, बाळकूम येथून साकेत आणि गोल्डन डाईज नाका मार्गे कळव्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congestion likely due to change in traffic of narli purnima in kalwa a amy
First published on: 10-08-2022 at 16:22 IST