दोन दिवसांत दहा नवे रुग्ण; बाजार सुरूच राहणार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : नवी मुंबईत करोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेली एपीएमसी बाजारही आता करोनाचा हॉट स्पॉट होत आहे. धान्य बाजारात ४ नवे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यात मंगळवारी मसाला मार्केटमधील हॉटेलमध्ये काम करणारा एक कामगार व त्याच्या संपर्कात आलेल्या अशा सहा जणांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे येथील करोना रुग्णांची संख्या १४  वर  पोहोचली आहे. त्यामुळे बाजार परिसरात भीतीचे वातावरण आहे. असे असले तरी एपीएमसीतून जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होत असल्याने अत्यावश्यक काळजी घेत बाजार सुरूच राहणार असल्याचे एपीएमसी प्रशासनाने सांगितले आहे.

ज्याची भीती होती तेच झाले. नवी मुंबईतील एपीएमसीचे पाचही बाजार हे गर्दीची ठिकाणे असल्याने या ठिकाणी करोना संसर्गाचा मोठा धोका होता. त्यामुळे या ठिकाणी शेतमाल खरेदीसाठी मुंबई, ठाण्यातून खरेदीदार येत असल्याने संसर्गाची मोठी भीती होती. त्यामुळे एपीएमसीतील सर्व घटकांनी बाजार बंद करण्याचा दोन वेळा निर्णय घेतला होता. मात्र शासनाने या ठिकाणांहून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत असल्याने बाजार पुर्ववत सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे हे बाजार सुरू होते.

२७ एप्रिलला भाजीपाला व धान्य बाजारातील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. हे व्यापारी धान्य बाजारात जी विंगमध्ये व्यापार करत होते तर कोपरखैरणेमध्ये राहत आहेत. यापूर्वी एल विंगमधील व्यापाऱ्याला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर मसाला बाजारातील व्यापाऱ्याला करोनाचा संसर्ग झाला.

मंगळवारी येथील एका हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी व त्याचा संपर्कात आलेल्या सहा जणांचा करोनाची लागण झाली. मंगळवारी एका दिवसात सहा करोना रुग्ण सापडल्यानंतर बुधवारीही यात आणखी धान्य बाजारातील चार व्यापाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एपीएमसी परिसरात भीतीचे वातावरण आहे.

एपीएमसी आवारात करोनाचा अधिक प्रसार होऊ नये म्हणून बाजार समिती पुढील १४ दिवस बंद ठेवण्यात यावी अशी सूचना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एपीएमसी व पोलिसांना करण्यात आली आहे. या ठिकाणांहून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत असल्याने  कोकण आयुक्त, जिल्ह्याधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि एपीएमसी प्रशासन यांनी मंगळवारी बैठक घेत बाजार समिती सुरळीत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापारी आणि माथाडी कामगारांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. फळबाजारात आणखी ७ ते ८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे ती जर सकारात्मक आली तर फळ बाजार बंदचा निर्णय घेऊ असे मत फळबाजार संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.

खबरदारी कायम 

एपीएमसीतील पाचही बाजारातून मुंबई, ठाणे व उपनगरांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होत असतो. त्यामुळे हे बाजार बंद करता येणार नाहीत. मात्र संक्रमण रोखण्यासाठी अधिकची खबरदारी घेत हे बाजार सुरूच ठेवले जातील असे एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus outbreak 4 new covid 19 positve patients in apmc grain market zws