ठाणे : व्हिडीओ काॅल करुन डिजीटल अटकेची धमकी देत तीन कोटी उकळणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांना ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. डिजीटल अटकेच्या माध्यमातून या टोळीने आणखी कितीजणांना फसविले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
किशोर जैन (६३), महेश कोठारी (३६) आणि धवल भालेराव (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील किशोर जैन हा एका पतपेढीचा अध्यक्ष आहे. महेश कोठारी हा कपडे विक्री तर धवल हा सौंदर्यवर्धक उत्पादनाचा व्यवसाय करतो. ते या टोळीच्या संपर्कात कसे आले याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे. पोलीस किंवा केंद्रीय तपास यंत्रणातील अधिकारी असल्याचे भासवून गेल्या काही वर्षांत अनेक नागरिकांची ऑनलाईनद्वारे फसवणूक झाली आहे.
अशाच प्रकारची फसवणूक ठाण्यातील एका व्यक्तीची झाली होती. त्यांना अनोळखी व्यक्तीने व्हिडीओ काॅल करून सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याची बतावणी केली होती. तो त्यांना अमली पदार्थ प्रकरणात अटकेची भिती दाखवत होता. बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी बँक खात्यातून तीन कोटी चार लाख रुपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने या सायबर गुन्हेगारांना पाठविली होती. याप्रकरणात फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनंतर ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण पथकाकडून सुरु होता.
दरम्यान, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला असता, त्यात किशोर जैन, महेश कोठारी आणि धवल भालेराव यांची नावे पुढे आली. या तिघांनी आभासी चलनाच्या (क्रिप्टो) माध्यमातून काहीजणांना परदेशात रक्कम पाठविल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची चौकशी सध्या सायबर पोलिसांकडून सुरू आहे. यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे नागरिकांची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.