ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन बुधवारी, ८ ऑक्टोबरला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या उद्घाटनास उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने नवी मुंबईत ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फलक (बॅनर) उभारण्यात आले आहेत. भाजपने फलकबाजी करुन फलकावर विमानतळाला दि.बा. पाटील यांचे दिले आहे. असे असले तरी अदानी उद्योग समूहाकडूनही फलक उभारण्यात आला आहे. परंतु या फलकावरुन दि.बा. पाटील यांचे नाव गायब असल्याचे दिसते आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच सुरु होणार असून सध्या दरवर्षी सुमारे २० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. विमानतळाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील विकासाचे आणि पायाभूत सुविधांचे धोरणात्मक नियोजन केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यास ठाणे, मुंबई, उपनगर, रायगड, पालघर भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि उपनगरातील भूमिपूत्रांकडून केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी आंदोलानाची हाक देखील दिली होती. त्यापूर्वी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांच्या नेतृत्त्वाखाली एका कार रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते. तर ६ ऑक्टोबरला मोठे आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा म्हात्रे यांनी दिला होता. परंतु विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ल्यानंतर भूमिपूत्रांनी आंदोलन स्थगित केले.

असे असले तरी भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळाच्या उद्घाटनाला येणार असल्याने ठिकठिकाणी फलकबाजी केली. या फलकावर दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख केला आहे. तसेच अदानी समूहाकडून देखील येथे फलक उभारण्यात आले आहे. परंतु त्यावर दि.बा. पाटील यांचे नाव दिसून येत नाही.

काय आहे फलकावर

संबंधित फलकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र आहे. तसेच या छायाचित्राच्या एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. फलकावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको अदानी असा उल्लेख इंग्रजी भाषेत आहे. तर मराठी भाषेमध्ये ‘शिवछत्रपतींच्या प्रेरणेतून साकार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा उल्लेख करण्यता आला आहे. या फलकांजवळच भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे फलक देखील दिसत आहे. त्यामुळे हे फलक सध्या नवी मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे.