Dombivli MIDC Blast Latest Updates: डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागात असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठ्ठा स्फोट झाला आहे. त्यानंतर छोट्या स्फोटांचे काही आवाजही ऐकू आले आहेत. या स्फोटांमुळे साधारण तीन ते चार किमीचा परिसर हादरला आहे. डोंबिवली एमआयडीसी भागातल्या नेमक्या कुठल्या कंपनीत हा स्फोट झाला? ही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र आगीचे लोळ आणि धुराचे लोट हवेत दिसून येत आहेत. या स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी एमआयडीसीवर आरोप केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत पोस्ट केली आहे.

या स्फोटानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एमआयडीसीवर आरोप केले आहेत. दोन वर्षांपासून एमआयडीसीकडून कोणत्याही कंपनीचे फायर ऑडिट करण्यात आलेले नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Dombivli MIDC Blast: डोंबिवली स्फोटाने पुन्हा हादरली, एमआयडीसी फेज दोनमध्ये अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी जी काळजी घ्यायची असते ती प्रशासनिक पातळीवर कधीच घेतली जात नाही. महत्त्वाचे म्हणजे फायर ऑडिटसारखी गोष्ट महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याच विभागाद्वारे केली जात नाही. त्यामुळे आग लागल्यावर ज्या उपाय योजना कराव्या लागतात, त्या योग्य वेळत होते नाही. त्यामुळे आग वाढते आणि अनेकांचा मृत्यू होतो. माध्यमं दोन दिवस बातमी चालवतात. नंतर सगळं विसरून जातात. मृत्यू झालेल्यांना काही आर्थिक मदत दिली जाते. मात्र, त्यानंतर त्या घटनेची कोणतीही चर्चा होत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय?

डोंबिवली एमआयडीसीतील अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. आठ जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमूला पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

भीषण स्फोटानंतर एमआयडीसीतून बाहेर पडलेल्या एका कामगाराने सांगितलं की, स्फोट झाला ती आमच्या बाजूची कंपनी होती. इतका मोठा स्फोट होता की, आम्ही सगळे बाहेर पडलो. सगळे आगीचे लोळ येत होते. आमच्या हाताला भाजले आहे, असं कामगाराने टीव्ही ९ ला सांगितलं.

काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मोठे स्फोट झाले, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत. अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाणे अद्याप शक्य झालेले नाही. अजूनही आग नियंत्रणात आणण्याचे प्रय़त्न सुरु आहेत.