ठाणेः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबरनाथ येथील नव्या न्यायालयाच्या उद्घाटनासाठी ठाण्याहून हेलिकॉप्टरने येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली. अंबरनाथच्या चिखलोली भागात हे न्यायालय आहे. विशेष म्हणजे हा अवघा ३५ किलोमीटरचा प्रवास आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच महत्वाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कोंडी होते आहे.

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमध्ये कोंडीचे नवनवे विक्रम होताा दिसतात. अशा रस्त्यांवर सर्वसामान्य अडकून पडत असताना उपमुख्यमंत्र्यांचे उड्डाण मात्र सुरू असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अशाच एका नियोजीत उड्डाणावर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी टीका केली होती. त्यानंतर शिंदे यांनी रस्ते मार्गाने प्रवास केला. त्यावेळी खराब हवामानाचे कारण देण्यात आले होते.

गेल्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यात वाहतूक कोंडीची अनेक उदाहरण समोर येत आहेत. घोडबंदर रस्ता, गायमुख रस्ता, ठाण्यातील मुख्य रस्ते, राजनोली मार्ग, राजनोली दुर्गाडी, कल्याण शिळफाटा, कल्याण काटई आणि अंबरनाथ रस्ता, कल्याण बदलापूर रस्ता, शिळफाटा चौक, महापे चौक, ठाणे शहराचे प्रवेशद्वार असे कित्येक रस्ते आणि चौक सध्या कोंडीत आहेत. कोंडीची कारणे काही तत्कालीक आहेत तर काही जुनीच आहेत. मात्र दरवर्षी वाहनचालकांना पावसाळ्यात या त्रासाला सामोरे जावे लागते. काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत, काही ठिकाणी चौक विस्तारीकरण रखडले तर काही रस्तेच अरूंद पडत आहेत. त्यामुळे नागरिक सातत्याने कोंडीत सापडत आहे. परिणामी नागरिकांचा मोठा वेळ, इंधन आणि श्रम खर्ची पडत आहेत. लोकलची गर्दी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे रस्ते मार्ग स्विकारणाऱ्या नागरिकांना कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो.

नागरिकांचे असे हाल सुरू असताना दुसरीकडे मंत्र्यांचे मात्र लहानशा प्रवासासाठीही हेलिकॉप्टर उड्डाण सुरू असल्याने संताप व्यक्त होतो आहे. शनिवारी अंबरनाथ शहरात कनिष्ठ न्यायालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतो आहे. या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे चक्क हेलिकॉप्टरचा प्रवास करणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

सकाळी साडे १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे साडे नऊ वाजता ठाण्यातील आपल्या निवासस्थानाहून रेमंड हेलिपॅड येथे जाणार आहेत. तेथून ते उसाटणे येथील हेलिपॅडवर पोहोचणार आहेत. तेथून ते मोटारीने अंबरनाथच्या न्यायालयाच्या कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत. रेमंड हेलिपॅड ते उसाटणे हे अंतर अंदाजे ३० किलोमीटर आहे. तर उसाटणे येथून अंबरनाथचे न्यायालय अंदाजे १५ किलोमीटर आहे. त्यानंतर पुन्हा परतीचा प्रवासही ते याच हवाई मार्गाने करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या प्रवासावर टीका होण्याची शक्यता आहे.