ठाणे : घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीची पाहणी शुक्रवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. गायमुख घाटातील ६० मीटरचा रस्ता मंजूर केला आहे. भविष्यात ६० मीटरचा रस्ता झाल्यानंतर येथील कोंडी फुटेल असा दावा त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना केला.

घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू झाले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ उपस्थित होते. शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पावसाळ्यात रस्ता खराब झाल्याने या मार्गावर वाहतुक कोंडी होते. वारंवार खड्डे भरून देखील रस्ता टिकत नव्हता. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती केली जात आहे. रस्ता दुरुस्त केल्यानंतर तो टिकणार आहे. गायमुख घाटात ६० मीटरचा रस्ता मंजूर केला आहे.

हा मार्ग उन्नत असून भविष्यात ६० मीटरचा रस्ता झाल्यानंतर येथील कोंडीची समस्या सुटणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. येथील वाहतुक कोंडी समस्या दूर करण्यासाठी प्राधान्य द्या अशा सूचना बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.