ठाणे : स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड ही योजना लोकांसाठी संजीवनी ठरेल. ही योजना यापुर्वीच राबविणे गरजेचे होते. परंतु ५० ते ६० वर्ष काँग्रेस सरकार होते आणि त्यांनी देशातील लोकांना वंचित ठेवले, असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी देशातील ५० हजार गावांमधील ५८ लाख लाभार्थींना स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वितरण करण्यात आले. ऑनलाईनद्वारे झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे येथून सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते देखील ठाणे जिल्ह्यातील स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टिका केली. स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड चे वाटप ऑनलाइनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ५० हजार गावांमध्ये ६५ लाख ग्रामस्थांना या प्रॉपर्टी कार्डचे वितरण झाले. या कार्डमुळे जागेची हद्द, घरांची हद्द आणि सीमांकन याबद्दल चे वाद संपुष्टात येतील आणि त्याचबरोबर प्रत्येकाला मालकी हक्क मिळेल. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्र नाही तर देशासाठी ऐतिहासिक आहे, असे शिंदे म्हणाले.

हेही वाचा…वेतनाची मागणी केली म्हणून डोंबिवलीत पलावा येथे दोन भावांना विकासकाची मारहाण

प्रॉपर्टी कार्डमुळे अनेकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आणि त्यांनी व्यवसायात प्रगतीही केली आहे. अतिशय ऐतिहासिक अशी हि योजना आहे. यापुर्वीच ही योजना राबविणे गरजेचे होते. परंतु ५० ते ६० वर्ष काँग्रेसचे सरकार होते आणि त्यांनी देशातील लोकांना वंचित ठेवले, अशी टिका त्यांनी केली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि त्यांनी अनेक योजना सुरू केल्या. २०२२ मध्ये त्यांनी स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड योजनेची सुरूवात केली. त्याला मूर्त रूप आले आहे. गाव समृद्ध झाले की देश समृद्ध होतो, म्हणूनच देशाचा विकास करायचा असेल तर गावापासून करायला हवा. त्याचीच सुरूवात या योजनेच्या माध्यमातून झाली आहे. देशासह राज्यातील नागरिकांना योजनाचा फायदा होईल आणि त्यांच्यासाठी ही योजना संजीवनी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm eknath shinde said samtavim yojana property card benefits congress depriving people for 50 to 60 years sud 02