ठाणे : महामुंबई आणि विशेषत: ठाणे जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी टाळली जावी यासाठी रात्री १२ ते पहाटे पाच या वेळेतच या वाहनांना परवानगी देण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश अवघ्या तीन दिवसांत मागे घेण्याची वेळ या जिल्हा प्रशासनावर ओढावली. शिंदे यांच्या आदेशामुळे माल वाहतूक जवळपास ठप्प झाल्याने उद्याोग क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय तातडीने बदलण्याचे आदेश दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

घोडबंदर रोड हा ठाणे शहर, मीरा-भाईंदर, पालघर तसेच जिल्हा बाहेर जाणाऱ्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. जेएनपीटीहून येणारे कंटेनर ट्रक, जड वाहने, स्थानिक प्रवासी वाहतूक आणि टॅक्सी, रिक्षांचा मोठा ओघ असल्याने या मार्गावर सध्या मोठी कोंडी होत आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रहिवाशांनी आंदोलनही केले होते. नागरिकांचा दररोज वाढणारा हा रोष पाहून बुधवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी एक विशेष बैठक बोलावली. त्यास जेएनपीए, जिल्हा प्रशासन, वाहतूक पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते. या बैठकीनंतर शिंदे यांनी मध्यरात्री १२ ते पहाटे ५ या वेळेतच अवजड वाहने मुख्य रस्त्यांवर सोडली जातील, अशी भूमिका घेतली. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करा, असे आदेशही शिंदे यांनी दिले. या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी नवी वाहतूक व्यवस्थेचा आदेश काढत ठाणे, नवी मुंबई आणि पालघर-वसई भागातील वाहतूक यंत्रणांना सतर्क केले. एकही अवजड वाहन मुख्य रस्त्यांवर येऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या गेल्या. पालघर भागात अवजड वाहनांसाठी विशेष थांब्याच्या व्यवस्थेचे नियोजनही हाती घेण्यात आले होते.

उद्याोग जगतात नाराजी, दुखणेही कायम

इतकी सगळी आखणी केल्यानंतरही मुख्य मार्गावर कोंडीचे दुखणे मात्र कायम राहिले. गुजरात तसेच परराज्यातून येणारी वाहने ठाण्याच्या दिशेने येण्यापूर्वीच अडवली जाऊ लागली. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील ग्रामीण भाग, वसई-पालघर महामार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागू लागल्या. या रांगा थेट गुजरातच्या सीमेपर्यंत पोहोचल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. जेएनपीए बंदरात कंटेनंर हातळणीचे गणित यामुळे बिघडू लागले. बंदरावर उतरणारा माल वेळेत गोदामे तसेच कारखान्यांपर्यत पोहोचत नसल्याची ओरड वाढू लागल्याने उद्याोग क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेपानंतर नवा आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी यासंबंधी सह्याद्री अतिथिगृहात एका तातडीची बैठक घेतल्याचे समजते. या बैठकीस शिंदे उपस्थित नव्हते. मात्र ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावेळी बोलविण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सरसकट दिवसभर अवजड वाहनांना बंदी करण्याच्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. अवजड वाहतुकीला अशा पद्धतीने बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे उद्याोगांवर मोठा परिणाम दिसेल. कोंडी टाळण्यासाठी दिवसा या वाहतुकीसाठी वेळ निश्चित करून घ्या आणि ही वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यासाठी वेगवेगळ्या उपायांची आखणी करा, असे आदेश फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या अनौपचारिक बैठकीनंतर २४ तासात ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीची नवी अधिसूचना काढत ठाणे जिल्ह्यातून दिवसा म्हणजे सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यत अवजड वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.