डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने काही जाहिरात एजन्सीने आपल्या जाहिरतीचे फलक लावले आहेत. या जाहिरात फलकांमुळे दूरवरून लोकल धावण्याचे दर्शक (इंडिकेटर) दिसत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी डोंबिवली पश्चिमेतून प्रवासी रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर आला की या प्रवाशाला फलाट क्रमांक एक ते पाच क्रमांकावरून कोणत्या लोकल धावत आहेत याची माहिती इंडिकेटरच्या माध्यमातून एका पाहणीत, नजरेत मिळत होती. डोंबिवली पूर्व भागातून स्कायवाॅकवर प्रवासी आला की त्याला फलाट क्रमांंक पाच ते एकवरून कोणत्या लोकल कोणत्या वेळेत धावत आहेत याची माहिती इंडिकेटरच्या माध्यमातून एका नजरेत मिळत होती. त्याप्रमाणे प्रवासी कोणत्या फलाटावर लोकल पकडण्यासाठी उतरायचे याचा निर्णय घेत होते.
हे ही वाचा… कल्याणमध्ये बैलबाजारात प्रतिबंधित औषधांसह दोन जण अटकेत
गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर रेल्वे प्रशासनाने काही जाहिरात एजन्सींना लहान जाहिरात फलक लावण्यास परवानगी दिली आहे. हे फलक स्कायवाॅकवरील छताच्या भागात एका पाठोपाठ लावण्यात आले आहेत. या जाहिरात फलकांमुळे यापूर्वी पूर्व, पश्चिम भागातून स्कायवाॅकवर आलेला प्रत्येक प्रवासी दूरवरून दोन्ही बाजुची दर्शक (इंडिकेटर ) पाहू शकत होता. आता प्रवाशांंना स्कायवाॅकवरील जाहिरात फलकांमुळे दूरवरून दर्शक दिसत नसल्याने प्रवाशांना वेगळ्या बाजुला होऊन, वाकून इंडिकेटर पाहावी लागतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
महसुली उत्पन्नाचा भाग म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने जाहिरात एजन्सींना जरूर रेल्वे स्थानक, स्कायवाॅकवर फलक लावण्यास परवानगी द्यावी. परंतु, प्रवाशांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने काळजी घ्यावी. तशा सूचना जाहिरात एजन्सींना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
हे ही वाचा… ठाणे पुर्व सॅटीसवरील व्यापारी संकुल दिड वर्षात खुले होणार; व्यापारी संकुलातील आठ मजले रेल्वे देणार भाड्याने
महसुली उत्पन्नाचा भाग म्हणून रेल्वेने जाहिरात एजन्सीना परवानगी दिली असेल. प्रवाशांची गैरसोय होईल अशा पध्दतीने ते फलक लावण्यास रेल्वेने जाहिरात एजन्सीना परवानगी देऊ नये. आता डोंबिवली रेल्वे स्थानकात लावण्यात आलेले फलक लांबून इंडिकेटर दिसत नाहीत अशा पध्दतीने लावले आहेत. त्याचा विचार रेल्वेने करावा. प्रवाशांची होणारी ही गैरसोय विचारात घेऊन आपण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना याविषयी कळविणार आहोत. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ.
रेल्वे प्रवाशांची गैरसोय होईल अशा पध्दतीने रेल्वे स्थानकात, स्कायवाॅकवर फलक लावण्यास रेल्वे प्रशासन कधीही परवानगी देत नाही. डोंबिवली रेल्वे स्थानकात असा प्रकार घडला असेल तर त्याची तात्काळ दखल घेतली जाईल. – डाॅ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.
© The Indian Express (P) Ltd