Central railway: ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील शेकडो दिवेकरांच्या मृत्यूचा सापळा ठरलेला आणि रेल्वे वाहतुकीस अडथळा ठरणारा सर्वात महत्त्वाचा दिवा रेल्वे फाटक मागील अनेक वर्षांपासून जागेच्या वादामुळे बंद झालेला नाही. फाटकावरील दिवा रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी भूमी अधिग्रहणातील मार्ग निघत नसल्याने पूलाचे काम रखडले असून आजही फाटकामधून जीवघेणा प्रवास सुरु आहे. २०१९ मध्ये रेल्वे पूल तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली होती. आता २०२६ उजाडत असतानाही हा प्रकल्प पूर्ण झालेला नसल्याने दिवेकर चिंतेत आहेत.
रेल्वे उड्डाणपूल तयार होत नसल्याने दिवसातून किमान ३५ ते ४० वेळा किंवा त्यापेक्षा जास्तवेळा हा रेल्वे फाटक वाहतुकीसाठी उघडावा लागतो. त्यामुळे त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होत असतो असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्याकाही वर्षांमध्ये दिवा शहरात मोठ्याप्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. कमी किमतीत घरे मिळत असल्याने अनेकजण या भागात वास्तव्यास गेली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकापैकी दि रेल्वे स्थानकाची ओळख झाली आहे. सकाळी या स्थानकातून रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश करताना गर्दीमुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल होतात. रेल्वे प्रवाशांच्या समस्ये प्रमाणेच येथे आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावर अनेक रेल्वे फाटक आहे. त्यापैकी दिवा रेल्वे फाटक हे सर्वात मोठ्या फाटकांपैकी एक आहे. या फाटकातून शेकडो वाहने पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात. तसेच रेल्वे प्रवासी देखील अनेकदा रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी फाटकातूनच प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी रेल्वे रुळ ओलांडताना फाटकामध्ये अनेक प्रवाशांनी जीव गमावला होता. सध्या येथे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी असल्याने हे प्रमाण घटले आहे.
२०१३ मध्ये ठाणे महापालिका आणि रेल्वेने दिवा रेल्वे फाटक बंद करुन तेथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ मध्ये या पूलाच्या प्रत्यक्ष बांधणीला सुरुवात झाली. रेल्वेकडून रेल्वेच्या हद्दीतील तर महापालिकेकडून स्थानक परिसरातील मार्गिका निर्माण केली जात आहे. परंतु भूमी अधिग्रहण होत नसल्याने मागील अनेक वर्ष हा प्रकल्प रखडला आहे. २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. २०२६ उजाडत असतानाही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. ११ ते १२ जमीन मालकांचा वाद प्रलंबित असून त्यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
दिवा स्थानकाच्या पूर्वेकडील काम सुरु आहे. परंतु पश्चिमेकडील काम भूमी अधिग्रहणामुळे थांबले आहे. भूमी अधिग्रहनाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच संबंधित जमीन मालकांसोबत बैठक घेतली जाणार आहे. भूमी अधिग्रहण झाल्यास वर्षभरात काम पूर्ण करणे शक्य असल्याचे ठाणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
दिवा रेल्वे फाटकातील रेल्वेच्या हद्दीतील पूल सुमारे दीड वर्षांपूर्वीच बांधून झाला आहे. महापालिकेकडून सुरु असलेल्या कामाविषयी आम्ही त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करत आहोत. रेल्वे उड्डाण पूलाचे काम रखडल्याने रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत असतो असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.