ठाणे – दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून ठाणे शहरातील राम मारूती रोड, मासुंदा तलाव परिसर, चिंतामणी चौक याठिकाणी तरूणांचा जल्लोष पाहायला मिळाला. पारंपारिक वेशभुषेत आलेल्या तरुण मंडळींनी डीजे आणि बँडच्या तालावर ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली.अनेकजण मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत छायाचित्र काढत असल्याचे दिसत होते. तर, काही आयोजकांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी बक्षीसाची लयलूट करत होते.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला ठाण्यात अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू झाले. थोड्यावेळाने तरूण तरूणींचे समूह मासुंदा तलाव, गडकरी चौक, राम मारूती रोड परिसरात दाखल होण्यास सुरूवात झाली. तरूण- तरुणी पारंपारिक साडी, कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमास उपस्थित होते. अनेकजण मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले होते. डिजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली. चिंतामणी चौकात महिला आघाडीच्या प्रमुख मिनाक्षी शिंदे यांच्याकडून गायक साजन बेंद्रे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आणि नेश डीजे चे आयोजन करण्यात आले होते. तरुणांनी सकाळपासून याठिकाणी गर्दी केली होती. याठिकाणी अभिनेते महेश मांजरेकर यांनी उपस्थिती लावली होती. तर, मासुंदातलाव येथे शिवसेना शिंदे गट युवासेना लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवळा पहाट कार्यक्रमात देखील तरुणांची गर्दी पाहायला मिळाली. याठिकाणी अभिनेता ललित प्रभाकर यांनी उपस्थिती लावली होती. ललित प्रभाकरचा व्यासपीठावर प्रवेश होताच तरुणांनी एकच जल्लोष केला.
यंदा सर्वाधिक मुली सहावारीमध्ये साडीत दिसून आल्या. काठपदरा ऐवजी यंदा मुलींनी कॉटन आणि सिल्क तसेच डिझाईनर साडीला अधिक पसंती दिली होती. तर, मुले विविध नक्षीदार कुर्त्यांमध्ये तसेच आकर्षित फेट्यांमध्ये दिसून आले. डीजेवर विविध सध्या ट्रेडिंगमध्ये असलेली गाणी वाजविण्यात येत होती. या गाण्यांवर तरूणाईने ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली. तर, अनेक तरुणांनी हातात फलक घेऊन एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. मासुंदा तलावाजवळ एका तरुणाने नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूच्या पार्श्वभूमीवर ‘‘धैर्य ज्याची ओळख सेवा त्याचा धर्म संकटामध्ये असतात उभे त्यांचा आम्हाला आहे गर्व” असे भारतीय सैनिकांविषयी लिहिले होते.
उपवन येथे प्रथमच दिवाळी पहाट
उपवन येथे यापूर्वी कधी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. केवल तरुण मंडळी आपल्या मित्रमैत्रिणींसह या तलावाच्या येथे जमत असत आणि छायाचित्र काढत. परंतू, यंदा प्रथमच जिजाऊ सामाजिक संस्था आणि शिवसेना शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमाने उपवन तलाव पलाईदेवी मंदिराजवळ दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला धर्मवीर आनंद दिघे, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक तर, जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे, त्यांचे पूत्र धिरज सांबरे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहेत. या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला अभिनेत्री किशोरी शहाणे आणि प्रार्थना बेहेर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर, तरुणांना आकर्षित करण्यासाठी याठिकाणी भव्य रील स्पर्धा, वेशभुषा स्पर्धा, बेस्ट ग्रुप डान्स स्पर्धा घेतली जात आहे.