डोंबिवली – अहमदाबाद येथे गुरूवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात डोंबिवलीत राजाजी पथावरील मढवी बंगल्याच्या परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षाच्या हवाई सुंदरीचा समावेश असल्याचे राज्य सरकारने प्रसिध्द केलेल्या विमानातील कर्मचाऱ्यांच्या यादीवरून उघडकीला आले आहे. आपली मुलगी सुरक्षित असेल, असा विश्वास कुटुंबियांना आहे.
रोशनी राजेंद्र सोनघरे असे या हवाई सुंदरीचे नाव आहे. अहमदाबाद ते लंडन या एअर इंडियाच्या विमानाला गुरुवारी दुपारी अपघात झाला. २४२ प्रवासी या विमान दुर्घटनेत मृत्यू पावले आहेत. याच विमानात इतर सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर (कृ मेंबर) हवाई सुंदरी म्हणून रोशनी सोनघरे हिचे कर्तव्य होते.
रोशनी कर्तव्यावर असलेल्या विमानाला अपघात झाल्याचे समजताच तिचे वडील, आई आणि भावाने तात्काळ मुंबईत दाखल झाले. डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथावरील मढवी बंगल्याच्या पाठीमागील भागातील न्यू उमिया कृपा सोसायटीत रोशनी आपले आई, वडील आणि भाऊ यांच्या सोबत राहत होती. मनमिळाऊ स्वभावाची, शालेय जीवनात हुशार असलेल्या रोशनीचे हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न होते. ते तिने शिक्षण पूर्ण करून साध्य केले होते. एअर इंडियात विमानात कर्तव्यावर जाताना ती गणवेशात जात होती, असे ती राहत असलेल्या इमारतीमधील रहिवाशांनी सांगितले.
स्काय लव्हर हर या नावाने ती इन्स्टाग्रामवर प्रभावक (इन्फ्लुअन्सर) होती. तिला ५४ हजार अनुयायी होते. आतापर्यंत तिने विविध प्रकारच्या एक हजाराहून अधिक प्रतिमा, मजकूर इन्स्टाग्रामवर सामायिक केल्या आहेत. एअर इंडियाच्या अपघाती विमानात रोशनी सोनघरे कर्तव्यावर असल्याचे समजताच डोंबिवलीचे स्थानिक आमदार आणि प्रदेश भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात राज्य सरकारच्या आपत्कालीन विमान अपघात विभागाशी संपर्क करून यासंदर्भातची माहिती घेणे, रोशनीच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारचे साहाय्य करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावरून हालचाली सुरू केल्या आहेत.
सोनघरे कुटुंबीय यापूर्वी मुंबईत वास्तव्याला होते. दोन वर्षापूर्वी ते डोंबिवलीत स्थलांतरित झाले, असे त्यांच्या परिचितांनी सांगितले. रोशनी अलीकडेच एअर इंडियाच्या सेवेत दाखल होती, असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.
सोनघरे कुटुंबीय राहत असलेल्या न्यू उमिया कृपा सोसायटीत दवाखाना चालविणाऱ्या डाॅ. गिरीश खांडगे यांनी सांगितले, सोनघरे कुटुंबीय वैद्यकीय उपचारासाठी आपल्याकडे येत होते. दोन दिवसापूर्वीच आपण कामावरून घरी परतणाऱ्या रोशनीशी संवाद साधला होता. कर्तव्य संपल्यानंतर ती रात्री अपरात्री भाड्याचे वाहन करून घरी परतत होती.