डोंबिवली – आपली तब्येत ठीक नाही. त्यामुळे केश कर्तनालयात मी ग्राहकांचे केस कापणार नाही, असे उत्तर डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील एका न्हाव्याने एका ग्राहकाला दिले. आपले केस न्हावी मुद्दाम कापत नाही. याचा राग आल्याने संतप्त झालेल्या ग्राहक आणि त्याच्या साथीदारांनी न्हाव्यासह त्याच्या कारागिरीला लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले. एका कारागिराचे डोके आपटून त्याच्या डोक्याला जखमी केले.
या मारहाणीनंतर तीन जणांचे टोळके दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी मूळचा उत्तरप्रदेशातील रहिवासी असलेल्या या न्हाव्याने विष्णुनगर पोलीस ठाण्यात अनोळखी तीन इसमांविरुध्द तक्रार केली आहे. आफताब सलमानी (३१) असे तक्रारदार न्हाव्याचे नाव आहे. ते कुटुंबियांसह डोंबिवली पश्चिमेतील चिंचोलीपाडा भागात राहतात. आफताब यांचे सुभाष रस्त्यावर अंगारा बारच्या समोर सैफ नावाने केशकर्तनालय आहे. सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत मालक आफताब दुकानात असतात. मोहम्मद वसीम हा सहकारी कारागीर आहे.
गेल्या आठवड्यात थंडीताप येत असल्याने आफताब सलमानी घरीच होते. डॉक्टरांकडून उपचार करून घेऊन ते आराम करत होते. घरी कंटाळा आल्याने आफताब सुभाष रस्त्यावरील आपल्या केशकर्तनालय भागात येऊन उभे राहिले होते. तब्येत ठीक नसल्याने ते दुकानात ग्राहकांचे केस कापण्यासाठी गेले नाहीत. दुकानात त्यांचा सहकारी मोहम्मद वसीम केशकर्तनालयात होता.
दुकानाबाहेर आफताब उभे होते. त्यावेळी तेथे तीन जण उभे होते. एकाने माझे तातडीने केस कापून दे. मला घाईने अन्यत्र जायचे आहे असे सांगितले. आफताब यांनी माझी तब्येत ठीक नाही. मी आता दुकानात केस कापण्यासाठी जाणार नाही असे समंजसपणे सांगितले. त्यावेळी एका इसमाने तू मुद्दाम माझे केस कापत नाहीस असे बोलत शिवीगाळ करत आफताब यांना मारहाण सुरू केली. आफताब दुकानात बचावासाठी गेले.
त्यावेळी एका इसमाने दुकानातील धारदार चाकू उचलून त्याचे वार आफताब यांच्या मांडीवर केले. आफताब यांना तीन जण एकत्रपणे मारहाण करत होते. त्यामुळे सहकारी मोहम्मद भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला तर त्याचे डोके भिंतीवर आपटून त्याला गंभीर जखमी करण्यात आले.
आफताब बचावासाठी ओरडा करत होते. त्यावेळी अन्य नागरिक तेथे जमा झाले. त्यानंतर टोळके तेथून दुचाकीवरून पळून गेले. एका इसमाने आफताब यांना पूर्ववैमनस्यामुळे तू त्याचे केस कापत नाहीस का. तु यापूर्वी त्याच्या नातेवाईकाची छेड काढली होतीस, असे प्रश्न करून आफताब यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. आपणास काही माहिती नाही अशी भूमिका आफताब यांनी घेतली. या प्रकाराने केशकर्तनालय परिसरात काही वेळ तणाव पसरला होता.
