डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्थानिक अधिकार्यांकडून कारवाई सुरू असुनही डोंबिवली पूर्व ग प्रभाग हद्दीत फेरीवाले चोरून लपून येऊन व्यवसाय करत आहेत. पालिकेचे कारवाई पथक निघून गेले की फेरीवाले पुन्हा रस्ते अडवून व्यवसाय करतात.
रिक्षा चालक वाहतूक पोलीस निघून गेले की रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून प्रवासी वाहतूक करत आहेत. रामनगर पोलीसांनी रस्ते अडविणाऱ्या एकूण सात ते आठ फेरीवाले, हातगाडी चालक, रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
डोंबिवली पूर्व हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या भागातील पद पथ, रस्ते पादचाऱ्यांना मोकळे राहतील यासाठी स्थानिक पालिका, वाहतूक अधिकारी प्रयत्न करत आहेत. अशाही परिस्थितीत काही फेरीवाले रस्ते अडवून खेळणी, मोबाइल कव्हर, कपडे विक्री करून नागरिकांची गैरसोय करत आहेत.
काही विक्रेते आपली हातगाडी पदपथाच्या कोपर्यावर उभी करून वडापाव, चायनिज, पाणी पुरी विक्री करत आहेत. हे करत असताना ते सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडर, शेगडी वापरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तरीही अनेक हातगाडी चालक मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हातगाड्या लावून व्यवसाय करतात.
काही रिक्षा चालक प्रवासी घेण्यासाठी रिक्षा वाहनतळ उपलब्ध असताना रिक्षा वाहनतळ सोडून डोंबिवली पूर्व, पश्चिमेतील रेल्वे प्रवेशद्वार, मुख्य वर्दळीचे चौक, रेल्वे स्थानक भागातील चौक, रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभ्या करून प्रवासी वाहतुकीला आणि इतर वाहनांना अडथळे निर्माण करत आहेत. नागरिकांना या उपद्रवी मंडळींकडून त्रास होत असल्याने पोलिसांनी अशा विक्रेत्यांच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. अशा प्रकारे एकूण सात ते आठ रिक्षा चालक, फेरीवाले, हातगाडी चालकांविरूद्ध गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत.
बहुतांशी फेरीवाले हे कुर्ला, मुंब्रा, मस्जिद बंदर, घाटकोपर, भायखळा परिसरातील आहेत. ग प्रभाग हद्दीत अलीकडे फेरीवाल्यांची संख्या वाढत चालल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
गुन्हे दाखल इसमांमध्ये कुर्ला येथील फेरीवाला इलीयास अन्सारी (३७) याचा समावेश आहे. ते डोंबिवली पूर्वेतील साई पूजा बार समोरील रस्त्यावर खेळणी विक्री करत होते. कपडे विक्रेता विजयकुमार गुप्ता (४०), कपडे विक्रेता अनुज सरोज वकील (१९), शेलार नाका येथील पदपथ अडवून हातगाडीवर चायनिज खाद्य पदार्थ विक्रेता उमेशकुमार गुप्ता (३५), डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौक येथील चिमणी गल्लीत रस्ता अडवून रिक्षा उभी करणारा सोहम पवार हा रिक्षा चालक, अशा व्यावसायिकांविरूद्ध पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
