डोंबिवली – गणपती मूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले होते. त्यावेळी काही गणेशभक्त गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर येऊन गणपतीची तयार मूर्ती लवकर मखरात, घरी नेण्याची घाई करू लागले. या मूर्ती तुम्हाला वेळेत सज्ज करून देतो असे सांगुनही काही गणेशभक्तांनी गणशोत्सव तोंडावर आला आहे. तरी तुम्ही आमच्या मूर्ती अद्याप का रंग देऊन सज्ज ठेवल्या नाहीत, असे प्रश्न करत आपणास काही गणेशभक्तांनी मारहाण केली. हा मारहाणीचा प्रकार वाढण्याची भीती विचारात घेऊन आपण कारखान्यातून निघून गेलो, अशी कबुली पळून गेलेले मूर्तीकार प्रफुल्ल तांबडे यांनी विष्णुनगर पोलिसांना दिली आहे.

तसेच, मूर्तीकार तांबडे यांनी ज्या गणेशभक्तांनी आपल्याकडे मागील तीन महिन्याच्या काळात गणपतीची मूर्ती आगाऊ पैसे देऊन नोंदणी केली होती. त्या गणेशभक्तांचे नोंदणीचे पैसे आपण नोंदणीची पावती दाखविल्यानंतर गणेशभक्तांना परत करणार आहोत, असे मूर्तीकार तांबडे यांनी पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात दिली आहे.

गणपती प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस अगोदर गणेशभक्तांना सज्ज मूर्ती देण्याऐवजी मूर्तीकार तांबडे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील आनंदी कला केंद्रातून रात्रीच्या वेळेत गणेशभक्तांकडून मारहाण होईल या भीतीने कारागिरांसह कारखाना उघडा ठेऊन पळून गेले. गणेशभक्त गणपती मूर्ती कारखान्यातून नेण्यासाठी आले तेव्हा मूर्तीकार तांबडे त्यांचे कारागिर कारखान्यात नव्हते. आपण दोन ते तीन महिन्यापूर्वी नोंदणी केलेली गणपती मूर्ती कारखान्यात नाही. आपली मूर्ती कोठे हे सांगण्यास कारखान्यात नाही. मूर्तीकार तांबडे यांचा मोबाईल फोन बंद. त्यामुळे गणेशभक्त संतप्त झाले. उद्या गणपती प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्ती कोठुन आणायची. आयत्यावेळी आपणास मूर्ती कोण देणार या विचाराने घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते संतप्त झाले.

या संतप्त भावनेतून गणेशभक्तांनी ती मूर्ती कोणी नोंदणी केली आहे. ती अन्य कोणाची आहे याची पर्वा न करता आनंदी कला केंद्रातून गणपती मूर्ती पळवून नेल्या. काहींच्या हाती काहीच न लागल्याने त्यांनी कारखान्यातील रंगकाम करणाऱ्या मशिनी, धोतरे, इतर वस्तू रागाच्या भरात उचलून नेल्या. गणेशभक्तांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन मूर्तीकार प्रफुल्ल तांबडे यांच्या विरुध्द फसवणुकीच्या तक्रारी केल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांबेड यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू केली. मूर्तीकार सातारा येथे त्यांच्या मूळगावी पळून गेला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी साताऱ्याला जाऊन प्रफुल्ल तांबडे यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू केली असतानाच, दुसऱ्या दिवशी तांबडे आपल्या आईसह स्वताहून पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी काही गणेशभक्तांनी केलेल्या मारहाणीचा प्रकार आणि हे प्रकार वाढण्याची भीती असल्याने आपण कारखान्यातून बाहेर पडलो, अशी माहिती पोलिसांना दिली. गणेशभक्तांचे नोंदणीचे घेतलेले पैसे आपण परत करणार आहोत, असे तांबडे यांनी पोलिसांना सांगितले. तांबडे आणि त्यांचे कारागिरी अतिशय मेहनती, कष्टाळु आहेत, असे अनेक भक्तांनी सांगितले. त्यांच्या कारखान्यात सुमारे साडे पाचशेहून अधिक गणपती मूर्तींची नोंदणी होती.