डोंबिवली : डोंंबिवली जवळील दावडी येथील राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांची जमीन हडप करून त्यावर आठ माळ्याची तनिष्का रेसिडेन्सी बेकायदा इमारत उभारणाऱ्या भूमाफियांची बेकायदा इमारत २३ दिवसांनी विविध अडथळ्यांवर मात करत आय प्रभागाने शुक्रवारी शक्तिमान कापकाम यंत्राच्या साहाय्याने भुईसपाट केली.

गेल्या महिन्यात आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिळ रस्त्यावरील व्यंकटेश पेट्रोलपंपामागील, सेंट जाॅन शाळेसमोरील तनिष्का रेसिडेन्सी ही बेकायदा इमारत तोडण्याचे काम सुरू केले होते. ललित महाजन आणि इतर स्थानिक भूमाफियांनी या बेकायदा इमारतीची उभारणी केली होती. महाजन यांना या बेकायदा इमारत प्रकरणी आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त पवार यांनी नोटिसा बजावल्या होत्या. भूमाफियांची या भागात खूप दहशत असल्याने पालिकेने दोन वेळा कारवाई लावूनही ती रद्द करावी लागली होती.

दावडी येथील तीन ते चार एकर जमिनीच्या महसुली कागदपत्रांवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, भिमराव आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे यांची नावे आहेत. या जमिनीवर स्थानिक भूमाफियांनी कब्जेवहिवाटीचा हक्क दाखवून ही जमीन आमच्या मालकी हक्काची आहे, असा दावा सुरू ठेऊन आंबेडकरांच्या वारसांना जमिनीचा ताबा देण्यास विरोध केला. दरम्यानच्या काळात भूमाफिया ललित महाजन आणि साथीदारांनी सहा ते सात वर्षापूर्वी या जमिनीवर आठ माळ्याची बेकायदा इमारत उभी केली.

या बेकायदा इमारत प्रकरणी रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांनी कल्याण डोंबिवली पालिकेकडे तक्रारी केल्या. या बेकायदा इमारतीवर कारवाईची मागणी केली. भूमाफियांच्या दहशतीपुढे पालिका, अन्य कोणाचाही टिकाव लागला नाही. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भातचे वृत्त प्रसिध्द करताच त्याची पालिका, पोलीस, शासनस्तरावर दखल घेतली. पालिका वरिष्ठांच्या निर्देशावरून शक्तिमान कापकाम यंत्राच्या साहाय्याने गेल्या महिन्यात तनिष्का रेसिडेन्सी बेकायदा इमारत तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती. गिरीराज कन्स्ट्रक्शनच्या नवीन शक्तिमान कापकाम यंत्राने तोडलेली आठ माळ्याची ही पहिलीच बेकायदा इमारत आहे.

तोडकामात अडथळे

कारवाई सुरू असताना माफियांनी अनेक अडथळे आणले. शक्तिमान कापकाम यंत्र तनिष्का रेसिडेन्सीच्या ठिकाणी आणताना २५ फूट उंचीवरील विद्युत वाहिन्या बाजुला कराव्या लागल्या. तोडकाम करताना शक्तिमान यंत्र अस्थिर झाल्याने जपानहून तंत्रज्ञ बोलवावे लागले. आठव्या माळ्यावरील जलकुंभ तोडताना जमिनीवर चौथरा तयार करून त्यावर शक्तिमान यंत्र चढविण्यात आले. तोडकामाची लगतच्या इमारतींना झळ बसली. उडणारी धूळ बसविण्यासाठी धूळशमन यंत्र तैनात होते.

डाॅ. आंबेडकरांच्या वारसांच्या जमिनीवरील बेकायदा इमारत तोडणे अडचणीचे आणि आव्हानात्मक होते. सर्व अडथळ्यांवर मात करत २३ दिवसांत ही इमारत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली. मानपाडा पोलिसांचे या कामी चांगले सहकार्य मिळाले. – भारत पवार,सहाय्यक आयुक्त,आय प्रभाग, कल्याण.