डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानक ते शहराच्या अंतर्गत भागातील रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले रस्ते अडवून व्यवसाय करत आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांना रिक्षा चालविणे मुश्किल झाले आहे. या दररोजच्या वाहन कोंडीला कंटाळून डोंबिवली शहर रिक्षा चालक मालक संघटनेने शुक्रवारी (ता. २४) रिक्षा चालकांच्या सहकार्याने कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या आंदोलना संदर्भात रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे, उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी महापालिका आयुक्तांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात रस्तोरस्ती फेरीवाले कसे ठाण मांडून बसले आहेत. त्याचा रिक्षा चालकांना कसा त्रास होत आहे याची व्यथा मांडली आहे.

या निवेदनात पुढेही म्हटले आहे, की ह प्रभागात फेरीवाला हटाव पथकात विजय भोईर हे पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते मागील वीस वर्षापासून ह प्रभागात सफाई कामगार ते वरिष्ठ लिपिक या पदापर्यंत पोहचले आहेत. एकाच प्रभागात अनेक वर्ष कार्यरत असल्याने आणि मागील काही वर्षांपासून ते फेरीवाला हटाव पथकात कार्यरत असल्याने फेरीवाल्यांबरोबर त्यांचे घनिष्ट संबंध निर्माण झाले आहेत. या स्नेह संबंधांमुळे फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही, अशी खंत निवेदनात व्यक्त केली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रस्ता हा सर्वाधिक प्रवासी, वाहन वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठी बाजारपेठ आहे. परंतु, या रस्त्याच्या दुतर्फा सकाळ, संध्याकाळी फेरीवाले रस्ते, पदपथ अडवून बसलेले असतात. त्यामुळे इतर वाहनांबरोबर रिक्षा चालकांना या भागातून वाहन चालवताना कसरत करावी लागते.

या गर्दीतून वाट काढत रिक्षा चालक जात असेल आणि अचानक रिक्षेचा थोडा धक्का पादचाऱ्याला लागला त्या पादचारी आणि इतर नागरिकांच्या रोषाला रिक्षा चालकाला सामोरे जावे लागते. गुप्ते रस्त्यावर काही अनर्थकारी घटना घडली तर मग या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न संघटनेने केला आहे.

गेल्याच आठवड्यात एका परप्रांतीय फेरीवाला महिलेने अंगावर डिझेल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. डोंबिवली पश्चिमेत फेरीवाल्यांनी स्वत:च्या जागा निश्चित केल्या आहेत. त्या जागेत त्या इतर कोणालाही बसून देत नाहीत. किंवा त्या जागेवर वाहन उभे करून देत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

पालिका आयुक्तांनी डोंबिवली पश्चिमेतील फेरीवाल्यांचा विषय गांभीयाने घेऊन रिक्षा चालकांना फेरीवाल्यांमुळे कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. या फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त केला नाहीतर मात्र २४ ऑक्टोबर रिक्षा चालक पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन केल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशारा रिक्षा चालक मालक संघटनेने दिला आहे. या निवेदनावर कैलास यादव, उदय शेट्टी, सुरेश आंगणे, राजेंद्र गुप्ता, विश्वंभर दुबे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. या निवेदनाची एक प्रत डोंबिवली वाहतूक विभागाला देण्यात आली आहे.

दरम्यान, डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त केला आहे. दररोज फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, असे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सांगीतले. दरम्यान, विजय भोईर यांनी काही महिन्यापूर्वीच आपली ह प्रभागातून बदली करण्याची मागणी करणारे पत्र वरिष्ठांना दिले आहे. आपण नेहमीच फेरीवाल्यांवर आणि नागरिकांकडून प्राप्त तक्रारीप्रमाणे कारवाई करतो, असे भोईर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.