डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील बहुतांशी मुख्य वर्दळीचे रस्ते अरूंद आहेत. या रस्त्यांवर कल्याण डोंबिवली पालिका, वाहतूक विभागाच्या फटाकेंचे मंच (स्टाॅल) उभारण्याच्या परवानग्या न घेता काही स्थानिक दादा, भाई, राजकीय मंडळींनी अधिकाऱ्यांना न जुमानता, अरेरावी करून मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर फटाक्यांचे मंच उभारले आहेत. ही उभारणी करताना काही ठिकाणी बँकेंची प्रवेशव्दारे, एटीएमकडे जाण्याचे नागरिकांचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकासमोरील घनश्याम गुप्ते या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर १५ बाय १० आकाराचा फटाके, फराळ विक्रीचा भव्य मंडप पालिका, पोलीस, वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना न जुमानता उभारण्यात आला आहे. महात्मा फुले या सर्वाधिक अरूंद आणि वर्दळीच्या रस्त्यावर दादा, भाईंनी आयडीबीआय बँकेच्या समोरील रस्त्यावर आणि आयसीआयसीआय बँँकेच्या एटीएमकडे जाण्याचा नागरिकांचा मार्ग बंद करून फटाके मंचची उभारणी केली आहे. या मंचच्या विरूध्द बाजुला रिक्षा वाहनतळ आहे. मंचच्या बाजुला दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून ठेवण्यात येतात.
एक अवजड वाहन या रस्त्यावर आले की संपूर्ण महात्मा फुले रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. अशा परिस्थितीत महात्मा फुले रस्त्यावर जागोजागी फटाक्यांचे बेकायदा मंच उभारण्यात आले आहेत. अशीच परिस्थिती पंडित दिनदयाळ रस्ता, देवीचौक, मोठागाव रस्ता, उमेशनगर, गणेशनगर, रेतीबंदर रस्ता, कोपर रस्ता भागात आहे.
डोंबिवली पश्चिमेत सुभाष रस्त्यावर एमएमआरडीएकडून सीमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. हा वर्दळीचा वाहतुकीसाठी बंद आहे. या रस्त्यावरील सर्व वाहतूक महात्मा फुले रस्त्यावरून होते. या वर्दळीत आता दादा, भाई तरूणांनी रस्ते, पदपथ अडवून वाहतुकीचा विचार न करता फटाक्यांचे मंच उभे केले आहेत. दिवाळी सण काळात या रस्त्यावरून वाहन चालविणे नाहीच. पण या रस्त्यावरून चालणे अवघड होणार आहे.
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागातील दिनदयाळ चौक ते जुने विष्णुनगर पोलीस ठाणे ते रेतीभवन ते पु. भा. भावे सभागृह दरम्यानचा रस्ता सर्वाधिक पादचारी, वाहन वर्दळीचा रस्ता आहे. ही सर्व अराजकसदृश्य परिस्थिती पाहून डोंबिवलीत प्रशासन शिल्लक आहे की नाही. वाहतूक, पोलीस अधिकारी यांचा धाक फटाके मंच उभारणाऱ्या दादा, भाईंना आहे की नाही असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. जागरूक नागरिक शेखर जोशी यांनी यासंदर्भात आयुक्त अभिनव गोयल यांना तक्रार केली आहे.
डोंबिवली पूर्व भागात परवानग्या न घेता उभारलेले बेकायदा फटाक्यांचे मंच फ प्रभाग साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी राजकीय दबाव न जुमानता तोडून टाकले. अशीच कारवाई डोंबिवली पश्चिमेत करण्यासाठी साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
फटाके मंच उभारणीसाठी विक्रेत्यांना आपण उमेशनगरमधील एक आरक्षित भूखंडाची जागा सुचवली आहे. मंच उभारणीसाठी काही परवानगीसाठी अर्ज आले आहेत. राखीव भूखंडावर मंच उभारणीच्या परवानग्या मंजूर केल्या जातील. रस्ते, पदपथांवरील पटाके मंचांवर कारवाई केली जाणार आहे. – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग.