डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका नामवंत शाळेतील वर्गात आपल्या मित्राबरोबर मस्ती करत असताना एका बारा वर्षाच्या मुलाच्या तोंडून चुकून मोठ्याने शिवी बाहेर आली. ही शिवी वर्गातील शिक्षकाने ऐकली. त्या शिक्षकाने संबंधित मुलाला चष्मा काढण्यास सांगून शिक्षा म्हणून त्याच्या गालावर चापटी मारल्या. तु जर माझ्या खासगी शिकवणी वर्गात असता तर तुला अजून मार दिला असता, असा दम दिला. हा सगळा प्रकार मुलाच्या कुटुंबीयांना समजल्यावर घडल्या घटनेची मुलाच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
मानपाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्याने शनिवारी गुन्हा दाखल करून घेतला आहे. यासाठी कुटुंबीयांनी बाल साहाय्य सुविधेतील कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. मुलाच्या आईने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात शाळेतून आल्यावर आपला मुलगा नेहमीप्रमाणे घरात न येता इमारतीचे जिने चढताना आपणास पाहून लपत होता. मुलगा असा का करतोय म्हणून विचारणा केली तर त्याने आपणास शाळेत सर ओरडले आणि आपली तक्रार आपल्या बाबांकडे केली आहे, असे सांगितले. आपण पतीकडे खात्री केली. त्यावेळी पतीने मुलाने शाळेत शिवीगाळ केली असल्याचे स्पष्ट केले.
या सगळ्या प्रकाराने अस्वस्थ झालेल्या आईने दुसऱ्या दिवशी मुलाला विश्वासात घेऊन तु शाळेत भोजनाचा डबा का खात नाही. तु नेहमीप्रमाणे घरात का वागत नाही. तुला झाले आहे काय, हे खर सांग, अशी विचारणा केली. त्यावेळी मुलाने आईला सांगितले, वर्गात शिक्षक शिकवत होते. पाठ सुरू असताना माझी मित्रा बरोबर मस्ती सुरू होती. यावेळी माझ्या तोंडून चुकून मोठ्याने शिवी बाहेर पडली. ही शिवी पाठ शिकवत असलेल्या शिक्षकांना ऐकू गेली. ते माझ्या जवळ आले. त्यांनी मला माझा चष्मा काढण्यास सांगितला. त्यांंनी माझ्या गालात दोन ते तीन चापटी मारल्या. हा प्रकार माझ्या खासगी शिकवणी वर्गात झाला असता तर तुला मी अजून खूप मार दिला असता, असा दम भरला. या प्रकाराने आपण घाबरलो असल्याचे पीडित मुलाने आईला सांगितले.
हा प्रकार ऐकून घेऊन मुलाच्या आईने बाल साहाय्य केंद्राला संपर्क केला. त्यांचे मार्गदर्शन घेतले. आणि मानपाडा पोलीस ठाण्यात येऊन आपल्या मुलाला मारहाण केलेल्या शिक्षका विरुध्द तक्रार केली. सबंधित शाळेचा विद्यार्थी, शिक्षकांंसंदर्भातील कठोर शिस्तीबाबत नावलौकिक आहे.
शाळेत शिक्षकांनी मुलांना मारू नये असा यापूर्वीच शासनाने आदेश काढला आहे. त्यामुळे शाळेत मुलांकडून काही गैरकृत्य घडले तर शिक्षक मुलांच्या पालकांना शाळेत बोलावून त्यांच्या समोर मुलाला आणि पालकांना योग्य समज देत असतात.