ठाणे – मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनासह विविध संस्थांकडून मदतीचा हात दिला जात आहे. दरम्यान नवी मुंबईतील आमदार मंदा म्हात्रे यांनी तुळजापुर तालुक्यातील ३०० हून अधिक शेतकऱ्यांना ६ ते ७ लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या ३५० किट्सचे वाटप केले.
राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे विविध भागातील शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. सर्वत्र चिखल पसरला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. घर, शेत, दुकाने यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने दिवाळीत शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने ३१ हजार कोटींची मदत जाहीर करुन दिलासा दिला. त्याचप्रमाणे नुकसान ग्रस्तांना विविध संस्था, व्यक्ती, राजकीय नेत्यांकडून मदत केली जात आहे. अशातच नवी मुंबईतील बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून तुळजापुर तालुक्यातील मौजे खडकी येथील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. मंदा म्हात्रे यांच्या सहकार्याने सुमारे ६ ते ७ लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या ३५० किट्स वाटप करण्यात आले.
ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, ग्रामस्थांचे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाण्यासाठी मदत केली आहे. तेथील दुकानदारांनीही वस्तू तात्काळ वितरीत करण्यास सहकार्य केले त्यामुळे हे शक्य झाले. प्रत्येकाने शेतकऱ्यांना जमेल तशी मदत करा असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे.
