उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून उफाळलेल्या रागामुळे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथ कॉलनी भागात बुधवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून दुसऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोनू शेख या व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या मेव्हण्यावर योगेश मिश्रा याच्यावर गोळीबार केला. गोळी लागल्याने योगेश गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने ठाण्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. गोळीबारादरम्यान आणखी एका व्यक्तीवर तलवारीने हल्ला करण्यात आला असून तोही किरकोळ जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपी मोनू शेख सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांच्या अनेक पथकांना विविध भागात रवाना करण्यात आले आहे.
या घटनेविषयी परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “हा प्रकार कौटुंबिक वादातून घडला आहे. जखमी व्यक्ती ही आरोपीची मेव्हणी असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेबाबत हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे साईनाथ कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे.