ठाणे : महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वृक्ष उन्मळून पडण्याचे सत्र सुरूच असून गुरूवारी दुपारी कळवा येथील गोपाळनगर परिसरात वृक्ष उन्मळून पडून दोनजण जखमी झाले. तर, पाच घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शहरातील वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत. अशा घटनेत नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तसेच वृक्ष पडून वाहनांचे आणि घरांचे नुकसान होत आहे.

हेही वाचा >>> अंबरनाथ, बदलापुरातील पाणी दरवाढ मागे; पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत घोषणा

यंदाच्या पावसाळ्यातही हे सत्र सुरूच आहे. गुरूवारी दुपारी कळवा येथील गोपाळनगर परिसरातील रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या हिरा पाटील चाळीमधील पाच घरांवर एक वृक्ष उन्मळून पडले. यात दोन जण जखमी झाले आहेत. दुर्वेश भोईर (२०) आणि मंजुषा केवड (२६) अशी जखमींची नावे आहेत. दुर्वेश यांच्या हाताला व पायाला तसेच पोटाला किरकोळ दुखापत झाली आहे.तर, मंजुषा यांच्या डोक्याला, डाव्या पायाला व हाताला दुखापत झाली आहे. या जखमींना उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत सिता धांडगले, रंजना शेळके, अंजली पेडणेकर, हर्षदा केवड आणि राधादेवी केवड, या पाच जणांच्या घराचे नुकसान झाले आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानांनी वृक्ष कापून बाजूला करण्याचे काम सुरू आहे.