कल्याण : राजमाता जिजामाता यांनी उत्तम व्यवस्थेसाठीचा संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांंवर केला. त्यातून आदर्श राज्याची उभारणी झाली. पण, राजमातेच्या नावे रस्ते बांधकाम कंपनी स्थापन करून बोगस रस्ते बांधायचे. त्यात गैरव्यवहार करायचे आणि ते गैरव्यवहार लपविण्यासाठी, चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी पुन्हा सत्ता स्थानाचा आश्रय घ्यायचा. हे सर्व उद्योग करणाऱ्या एका रस्ते ठेकेदारामुळे शहापूर, मुरबाड, वाडा भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधताना एका दलबदलू राजकीय रस्ते ठेकेदारावर केली. यावेळी त्यांनी संबंधिताचे नाव घेणे टाळले.

वाडा तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहापूर जवळील भातसा नदीच्या दोन्ही बाजुचा पोहच रस्ता, भातसा नदीवरील रस्त्याची वाताहत झाली आहे. मुरबाडमधील कुडवली रस्त्याचा भाग रखडला आहे. या रस्त्यांच्या दुर्दशेमुळे अपघात होऊन काही ठिकाणी २१ जण मृत तर १५ जणांना अपंगत्व आले आहे, अशी माहिती पत्रकारांनी आपणास दिली, असे पाटील यांनी सांगितले. ही सर्व रस्त्यांची दुरवस्था होत असताना शहापूर, मुरबाड, वाडा तालुक्यातील एकही स्थानिक लोकप्रतिनिधी या विषयावर एक शब्द त्या ठेकेदारा विरुध्द बोलण्यास तयार नाही. ही शोकांतिका आहे, असे ते म्हणाले.

रस्ते दुर्देशेवर बोलताना अलीकडेच शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेल्या एक रस्ते ठेकेदार कपील पाटील यांच्या टीकेचा लक्ष्य होता. पाटील यांनी त्या ठेकेदाराचे नाव घेणे टाळले. ठाणे, पालघर जिल्ह्यात कुठेही जा रखडलेली, दुर्दशा झालेली रस्ते कामे या ठेकेदाराची आहेत. या दुर्दशा झालेल्या रस्त्यांमुळे प्रवासी, वाहन चालक त्रस्त आहेत, रुग्णांना त्रास होत आहे. आपण सत्ता दरबारातील आश्रित असल्याने आपणास काही होणार नाही अशी यांची गुर्मी असते, असे पाटील यांनी सांगितले.

मागील पाच वर्षात भिवंडी लोकसभा क्षेत्रात मी एकही काम केले नाही, असे या भागाचे विद्यमान खासदार म्हणत असतील तर या लोकसभा क्षेत्रात मागील दहा वर्षात २८ हजार कोटीची कामे केली कोणी. केवळ पत्रे देऊन कामे होत नाहीत. त्यांनी मागील काही महिन्याच्या कालावधीत विकास कामांचा पाऊस पाडला आहे असे त्यांचे म्हणणे असेल आणि असे एखादे आदर्शवत काम त्यांनी दाखविले तर आपण त्यांचा जाहीर सत्कार करू, असे आव्हान पाटील यांनी नाव न घेता खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांना दिले.

राजमातेच्या नावाने ठेकेदार कंंपनी स्थापन करून त्या माध्यमातून कोणी बोगस कामे करत असतील तर शासनाने त्या रस्ते बांधकाम कंपनीवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले. आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग रखडला. आता कल्याणमधील बदललेल्या मेट्रो मार्गाच्या आराखड्याला शासनाने मान्यता दिली आहे. लवकरच या भागाचे काम सुरू होईल, असे ते म्हणाले.