Ganeshotsav 2025 : डोंबिवली – मागील दोन वर्षाच्या काळात प्रत्येक मुद्द्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना कैचीत पकडण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी केला. या कालावधीत ठाकरे गट आणि भाजपमध्ये समाज माध्यमांतून जोरदार धुमश्चक्रीचे वावटळ सुरू होते. हे वावटळ अलीकडे थोडे शांत झाले होते.

याच कालावधीत मागे काय घडले हे न पाहता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांच्या डोंबिवलीतील नवनाथ कृपा या बंगल्यात ठाकर गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची गणपती दर्शनाचे औचित्य साधून भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या भेटीमुळे प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर शाब्दिक युध्द खेळणारे कार्यकर्ते सर्वाधिक धारातिर्थी पडल्याचे चित्र आहे. आगरी समाजाचे वर्चस्व असलेल्या डोंबिवलीत आगरी समाजाचा आमदार पाहिजे. मात्र, कोकणी माणूस मागील वीस वर्ष या शहरातून आमदार म्हणून निवडून जात आहे. आगरी समाजाने या विषयावर जागृत झाले पाहिजे या विचारातून शिंदे शिवसेनेत असतानाच दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीतील आगरी समाजातील जुन्या जाणत्या कुटुंबीय, राजकीय मंडळींच्या भेटी घेतल्या. आगरी समाजाचा आमदार डोंबिवलीतून निवडून जाईल यादृष्टीने व्यूहरचना आखली.

पण, शिंदे शिवसेना, भाजपची युती. आगरी समाजाचा आमदार डोंबिवलीतून निवडून येईल असे जोरदार वातावरण दीपेश यांनी निर्माण केले होते. शिंदे शिवसेनेतून डोंबिवली विधानसभेसाठी आमदारकीसाठी उमेदवारी मिळत नाही हे पाहून दीपेश यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात डोंबिवलीत विधानसभेसाठी शड्डू ठोकले. बहुतांशी आगरी समाजाने दीपेश यांना पाठबळ दिले. डोंबिवलीत सुरूवातीला भाजपमध्ये अस्वस्थता होती. भाजपच्या बाजुने कट्टर संघ स्वयंसेवक आणि निष्ठावान भाजप कार्यकर्ते यांची तगडी फळी होती.

डोंबिवलीत विधानसभा पटकावयाचीच या इराद्याने दीपेश म्हात्रे कामाला लागले होते. नागरी समस्यांच्या विषयावरून चव्हाण यांना ठाकरे समर्थकांकडून लक्ष्य केले जात होते. जिंकायचेच या उद्देशाने दीपेश कामाला लागले होते. अखेर चव्हाण विजयी झाले. त्यानंतरही दीपेश यांनी नागरी समस्या, शहर विकासाचे विषय मार्गी लावण्यासाठी आपला लढा सुरू ठेवला आहे. एकहाती ठाकरे गटाचे नेतृत्व डोंबिवलीतून दीपेश करत आहेत. पक्षाची तगडी साथ त्यांना हवी ती मिळत नाही, अशी चर्चा आहे.

माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि पुंडलिक म्हात्रे हे नातेवाईक आहेत. या कौटुंबिक स्नेहसंबंधातून दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार अफवा काही दिवसांपासून आहेत. प्रत्यक्षात असे काही नाही, असे दीपेश समर्थकांनी सांगितले. आगामी पालिका निवडणुकीचा विचार करता डोंबिवलीतील ठाकरे गटाचे सामर्थ्य जेमतेम आहे. पालिकेवर भाजपला आपला झेंडा फडकावयाचा आहे. सक्षम नेतृत्व असे दीपेश यांचे व्यक्तिमत्व आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गणपती दर्शनाचे निमित्त साधून दीपेश म्हात्रे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विशेषता शिंदे गटात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.