कल्याण : माणकोली उड्डाण पुलाच्या भिवंडी हद्दीत नारपोली पोलीस बुधवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी काही संशयास्पद वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी दुचाकीवरून सुसाट वेगाने जात असलेल्या दोन तरूणांना रोखले. या तरूणांच्या दुचाकीतील साधन पेटीची (डिकी) तपासणी केली असता, पोलिसांना त्यामध्ये १० हजार ग्रॅम वजनाचा ८४ लाख ४७ हजार रूपये किमतीचा गांजा आढळला. पोलिसांनी तो जप्त केला. दोघांना ताब्यात घेतले.
गांजा तस्कर आता गांजाची नेआण करण्यासाठी दुचाकींचा वापर करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यासाठी रात्रीची वेळ निवडतात हेही पोलिसांना समजले. आकाश रमेश गुप्ता (२४, रा. सुभाषनगर चाळ, हनुमान मंदिर, उल्हासनगर), हर्ष रवी ब्राह्मणे (२६, रा. पंजाबी काॅलनी, सेक्टर तीन, गुरुनानक सोसायटी, उल्हासनगर) अशी गांजा तस्करांची नावे आहेत. नारपोली पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी कायद्याने या दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या आठवड्यात आंध्रप्रदेश, विशाखापट्टणम, महाराष्ट्राच्या विविध भागात गांजाची तस्करी करणाऱ्या १७ जणांच्या एका आंतरराज्य टोळीला कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पुढाकाराने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशावरून मोक्का लावला. गांजाची तस्करी सतरा जणांना एकावेळी मोक्का लावण्याची राज्यभरातील ही मोठी घटना आहे.
या घटनेची चर्चा सुरू असतानाच भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील पोलिसांनी बुधवारी रात्री उल्हासनगरच्या तस्कारांना गांजाची तस्करी करताना पकडले आहे.
नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील साई सहारा हाॅटेल समोरील सार्वजनिक रस्त्यावर माणकोली उड्डाण पुलाच्या जवळ बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. बुधवारी रात्री नारपोली पोलीस माणकोली उड्डाण पुलाच्या बाजुला संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना दोन तरूण दुचाकीवरून अवजड वाहनांचा आडोसा घेऊन सुसाट वेगाने पोलिसांची नजर चुकवून जात असल्याचे आढळले.
पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना रोखून धरले. तरीही हे तरूण आम्हाला घाई आहे असे सांगून पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करत होते. पोलिसांनी त्यांच्या दुचाकीतील साधन पेटीची तपासणी केली. त्यात त्यांंना गांजा झाडाची हिरवी सुकलेली बोंडे आणि पाने आढळली. हा सुकलेला गांजा ५१६ ग्रॅम वजनाप्रमाणे प्लास्टिक पिशव्यांमध्ये बंदिस्त केला होता. असा एकूण १० हजार ग्रॅम वजनाचा हा गांजा होता. हा संकरित गांजा असल्याचे पोलिसांना आढळले. बाजारातील या गांजाची किंमत ८४ लाख होती. पोलिसांनी या दोन्ही तरूणांचे मोबाईल, जवळील सामग्री जप्त करून त्यांच्यावर अंमली पदार्थ तस्करी कायद्यान गुन्हा दाखल केला.