Thane rain update, ठाणे – शहरात गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. शनिवार आणि रविवार संततधार पाऊस होता. परंतु, सोमवारी सकाळ पासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. तर, पावासामुळे घोडबंदर भागातील गायमुख परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. याचा परिणाम, घोडबंदरसह ठाणे शहरातील इतर मार्गावर झाला असून वाहतूक कोंडी झाली आहे.
गेले अनेक दिवस दडी मारुन बसलेल्या पावसाने शनिवारी ठाणे शहरात हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याने १५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान ठाणे जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, १५ ऑगस्ट म्हणजेच शनिवारी सकाळपासून ठाणे शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळी ११ नंतर पाऊस कमी झाला असला तरी, पावसाची रिपरिप सुरुच होती. परंतु, सायंकाळी ७ नंतर या पावसाने पुन्हा जोर धरला होता. या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते.
पावासामुळे घोडबंदर भागातील गायमुख परिसरात पाणी साचले. त्यामुळे येथील मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरु आहे. याचा परिणाम, घोडबंदरसह ठाणे शहरातील इतर मार्गावर झाला असून वाहतूक कोंडी झाली आहे.
व्हिडीओ सौजन्य – सचिन देशमानेhttps://t.co/ZfyIjgKlXt#Maharashtra #Rain #HeavyRain #Thane… pic.twitter.com/Ech78I2KOf— LoksattaLive (@LoksattaLive) August 18, 2025
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असलेल्या नोंदणी नुसार शनिवारी रात्री १०. ३० पर्यंत ठाणे शहरात ४२.६४ मिमी पाऊस पडला. तर, या पावसाचा जोर रविवारी मध्यरात्री तसेच दिवसाही कायम होता. रविवार असल्याकारणामुळे अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन आखले होते. या मुसळधार पावसामुळे अनेकांचा हिरमोड झाला. रविवारी दुपारनंतर पाऊस ओसरल्याचे दिसून आले. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. तीन दिवसाच्या सुट्टीनंतर अनेकजण आज कामाला जात होते. या पावसामुळे या नोकरदारवर्गाचे चांगलेच हाल झाले. त्यांना नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. तर, भाजी विक्रेते तसेच इतर फेरीवाले विक्रेते यांची देखील या पावसामुळे दैना उडल्याचे दिसून येत आहे.
घोडबंदर भागातील गायमुख परिसरात असलेल्या डोंगरातून पावसाचे पाणी खाली रस्त्यावर येत आहे. या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ते पाणी रस्त्यात साचले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. याचा परिणाम, घोडबंदरसह ठाणे शहरातील इतर मार्गावर झाला असून वाहतूक कोंडी झाली आहे.