Ghodbunder Road : ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोडबंदर मार्गावरील अवजड वाहतुक मध्यरात्री वगळता दिवसा होणारी अवजड वाहतुक भिवंडी मार्गाने वळविण्याचे निर्देश एका बैठकीत दिले. परंतु याचे परिणाम भिवंडी आणि कल्याणमधील नागरिकांना भोगावे लागण्याची शक्यता आहे.

भिवंडी आणि कल्याण शहरातील हजारो वाहन चालक मुंबई नाशिक महामार्गाने वाहतुक करत असतात. या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी होत असते. त्यात अवजड घोडबंदरच्या अवजड वाहनांना भार या मार्गावर वाढल्यास नागरिक कोंडीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे.उरण जेएनपीए बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर, मुंबई अहमदाबाद रोड मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. ठाणे शहरात अवजड वाहनांना निर्बंध आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार, घोडबंदर शहराज अवजड वाहनांना दररोज दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी आहे. घोडबंदर भागात मुख्य रस्त्यामध्ये सेवा रस्ता जोडणीचे काम केले जात आहे. तसेच मेट्रो मार्गिकांची कामे सुरू असून रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. घोडबंदर घाट रस्ता अरुंद असून येथे मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्याने दररोज घाटात वाहतुक कोंडी होत आहे. या वाहतुक कोंडीवरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दररोज मिरा भाईंदर, वसई भागातून ठाणे शहरात प्रवेश करणारे किंवा ठाण्यातून घाट मार्गे मिरा भाईंदरमध्ये प्रवास करणाऱ्यांना त्याचा प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

सरनाईकांचे निर्देश काय?

– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी ठाणे महापालिकेत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत वाहतुक विभाग, महापालिका अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले. त्यामुळे डिसेंबरपर्यंत या मार्गावर रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत अवजड वाहतुकीला परवानगी देण्यातआली. तर दिवसा दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत होणारी वाहतुक भिवंडी मार्गे वळविण्यात यावी अशी सूचना सरनाईक यांनी केली.

भिवंडी, कल्याणकरांना कोंडीचे संकट?

– मुंबई नाशिक महामार्गाने भिवंडी, कल्याण भागातील हजारो वाहन चालक वाहतुक करतात. अवजड वाहनांची वाहतुक भिवंडी मार्गे वळविण्यासाठी ही वाहतुक मुंबई नाशिक, काल्हेर, कशेळी, वाडा- भिवंडी मार्गे वळवावी लागणार आहे. त्यामुळे या मार्गावर घोडबंदरच्या अवजड वाहनांचा भार येऊन कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.