ठाणे : मिरा भाईंदर महापालिकेकडून पुन्हा एकदा घोडबंदर घाट रस्त्याचे काम सुरु झाले आहे. या कामामुळे तसेच एक अवजड वाहन रस्त्यावर उलटल्याने रविवारी सकाळपासून घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावरील नवघर ते काजुपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक व्यवसायिक, फिरण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक या वाहतुक कोंडीत अडकले आहेत.
या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमधून नेहमीप्रमाणे संताप व्यक्त होत आहे. परंतू, हे दुखण नेहमीचच झाले असून आता कोंडीत वेळ घालवण्यासाठी नागरिकांनी वेगळीच शक्कल वापरल्याचे दिसत आहे.
घोडबंदर मार्गावरुन हजारो अवजड वाहने उरण जेएनपीए येथून गुजरात, वसईच्या दिशेने वाहतुक करतात. तसेच गुजरात येथून भिवंडी, उरण जेएनपीए आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्यांचे प्रमाणही घोडबंदर मार्गावर अधिक असते. मिरा भाईंदर, वसई, ठाणे, बोरीवली भागातील नोकरदार, प्रवाशांसाठी देखील हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील घोडबंदर गायमुख घाट परिसराची मोठ्याप्रमाणात दुरावस्था झाली आहे. येथील मीरा-भाईंदर येथून ठाणेच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते निरा केंद्र या रस्त्यावर दुरुस्तीचे कार्य सुरु आहे.
त्यामुळे मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय पोलिसांनी अधिसूचना जारी करून दिनांक ११ ऑक्टोबर रात्री १२ ते १४ ऑक्टोबर रात्री १२ पर्यंत या रस्त्यावरील वाहतुकीसाठीची एक मार्गिका पूर्णत: बंद केली आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर ते ठाणे आणि ठाणे ते मीरा भाईंदर असा प्रवास हा ठाणे ते मीरा-भाईंदर या एकाच वाहिनीवरुन गायमुख घाट ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप दरम्यान सध्या सुरू आहे. त्यासाठी दोन्ही बाजूचे वाहने ही टप्प्या-टप्प्याने २० मिनिटे थांबून वाहतूक सोडली जाते.
त्यातच, रविवारी सकाळी ठाणे घोडबंदर वाहिनीवर गायमुख घाटाच्या अलीकडे हनुमान मंदिर समोर एक ट्रक पलटी झाला. या अपघाताचा फटका या वाहतूक व्यवस्थेवर बसला आहे. या कालावधीत मुंबई अहमदाबाद मार्गावरील नवघर ते काजुपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीत नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. तर, दुसरीकडे घोडबंदर मार्गावरील कोंडी हे नेहमीच दुखण असून काही नागरिकांनी कोंडीत बँडबाजा वाजवत कोंडीत वेळ घालवला आहे, तर, काही महिला वर्गाने देखील याला साथ देत बस मधून उतरुन या बँडच्या तालावर गरब्याचा ताल धरल्याचे दिसून आले. या घटनेचा विडीओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड प्रसारित होत आहे.