ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासून पावसाचा जोर वाढला असून मंगळवार सकाळपासून शहरात अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळत आहे. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत असतानाच, रस्ते कामादरम्यान वीज पुरवठा खंडीत झाल्याने ठाणे महापालिका परीवहन उपक्रम ( टिएमटी) च्या विद्युत बसगाड्यांची चार्जिंग सुविधा ठप्प झाली. यामुळे सकाळच्या वेळेत १२३ विद्युत बसगाड्यांपैकी जेमतेम ३१ बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी आगाराबाहेर पडल्या. ठाण्याची लाईफलाईन असलेल्या टिएमटीची बससेवा कोलमडून पडल्याने सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांचे हाल झाले.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या (टिएमटी) ताफ्यात ४५३ बसगाड्या असून त्यापैकी ३६३ बसगाड्या प्रवासी वाहतूकीसाठी उपलब्ध होत आहे. यामुळे बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पीएम ई बस योजनेतून १०० आणि केंद्र शासनाच्या एनसीएपी योजनेतून १६० अशा २६० विद्युत बसगाड्या वर्षभरात उपलब्ध होतील, असा दावा परिवहन प्रशासनाने अर्थसंकल्पात केला होता. सद्यस्थितीत टिएमटीच्या १२३ विद्युत बसगाड्या आहेत. पुणे येथील सेंट्रल इन्स्टीट्युट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार १ लाख लोकसंख्येस ३० बसगाड्या असणे आवश्यक आहे. ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे शहरात सुमारे ७५० आणि १० राखीव अशा एकूण ८२५ बसगाड्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात, ३६३ बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत असल्याने प्रवाशांच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी असल्याचे चित्र आहे. असे असतानाच, मंगळवारी सकाळी विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने विद्युत बसगाड्यांची सुविधा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
प्रवाशांचे हाल झाले
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण १२३ विद्युत बसगाड्या आहेत. या बसगाड्या वातानुकूलीत असून विविध मार्गांवर चालविण्यात येतात. गारेगार आणि आरामदायी प्रवासामुळे प्रवाशांची या बसगाड्यांना सर्वाधिक पसंती देतात. परंतु मंगळवारी या बसगाड्या रस्त्यावर तुरळक प्रमाणात सोडण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. ठाणे शहरात मंगळवारी रेड अलर्ट देण्यात आल्याने अनेक शाळा तसेच कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. असे असले तरी काही अत्यावश्यक सेवेसह इतर खासगी कार्यालये मात्र सुरूच होती. यामुळे सकाळी मुसळधार पावसातही कार्यालय गाठण्यासाठी अनेक नागरिक घराबाहेर पडले. पण, त्यांना रस्त्यावर बसगाड्याच उपलब्ध होत नव्हत्या. यामुळे त्याचे हाल झाले.
Video : मुसळधार पाऊस, वीज पुरवठा खंडीत अन् ठाण्याची टिएमटी विद्युत बसगाड्यांची सेवा कोलमडली https://t.co/2jrmCKvB4K
— LoksattaLive (@LoksattaLive) August 19, 2025
व्हिडीओ सौजन्य: लोकसत्ता टीम#Maharashtra #Thane #Heavyrainsdisrupt #Thane #TMTelectricbusservice pic.twitter.com/2UIk1m5Tsb
जेमतेम ३१ विद्युत बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी
ठाणे परिवहन उपक्रमात १२३ विद्युत बसगाड्या आहेत. त्यापैकी दररोज ११७ बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी विविध मार्गांवर चालविण्यात येतात. सहा बसगाड्या आगारात राखीव ठेवण्यात येतात. या बसगाड्यांचे चार्जिंग स्थानक कोपरी परिसरात उभारण्यात आले आहे. याठिकाणचा विद्युत पुरवठा सोमवारी रात्री ११ वाजता खंडीत झाला. यामुळे विद्युत बसगाड्यांची चार्जिंग सुविधा ठप्प झाली. यामुळे मंगळवारी पहाटे ५ वाजता जेमतेम ३१ बसगाड्या आगाराबाहेर काढण्यात आल्या. सकाळी विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर बसगाड्या चार्जिंग करून ९ वाजेनंतर त्या आगाराबाहेर टप्प्याटप्प्याने काढण्यात आल्या.
रस्ते खोदकामामुळे विद्युत पुरवठा खंडीत
कोपरी येथील विद्युत चार्जिंग स्थानकातील वीज पुरवठा सोमवारी रात्री ११ वाजता ठप्प झाला होता. या भागात रस्ते खोदाई कामादरम्यान विद्युत वाहिनी तुटली होती. या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सकाळपर्यंत सुरू होते. यामुळे बसगाड्या चार्जिंग होऊ शकल्या नव्हत्या. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ठेकेदाराने खोपट येथील चार्जिग स्थानकात बस नेऊन तिथे चार्ज केल्या. यामुळे सकाळच्या वेळेत प्रवासी सुविधेसाठी नेहमीपेक्षा कमी बसगाड्या उपलब्ध होत्या, अशी माहिती टिएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली.