ठाणे : घोडबंदर मार्गावरील वर्सोवा पूल येथे एक अवजड वाहन शनिवारी पहाटे अचानक बंद पडल्याने वर्सोवा पूल ते कासारवडवली पर्यंत वाहतुक कोंडी झाली. या वाहतुक कोंडीमुळे घोडबंदरहून मिरा भाईंदर, बोरीवली, वसईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. शनिवारी, आज सकाळी ८.३० नंतरही वाहतुक कोंडी कायम होती.

ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने अवजड वाहन वाहतुक करत होते. शनिवारी पहाटे ४.४५ वाजताच्या सुमारास अवजड वाहन घोडबंदर येथील वर्सोवा पूल भागात आले असता वाहन अचानक बंद पडले. पहाटे घोडबंदर मार्गावरून मोठ्याप्रमाणात अवजड वाहनांची वाहतुक होत असते. हे वाहन बंद पडल्याने गुजरात, वसईच्या दिशेने निघालेल्या इतर अवजड वाहनांच्याही रांगा लागल्या.

वाहतुक कोंडी झाल्याने काही अवजड वाहनातील चालकांनी त्यांचे वाहन बंद करुन वाहनातच झोप काढण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिरा भाईंदर पोलीस आणि ठाणे वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर पथकांनी येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केला. काहीवेळाने अवजड वाहन सुरु झाले. त्यानंतर येथील वाहतुक सुरु झाली. परंतु वाहनांच्या रांगा ठाण्यातील कासारवडवली पर्यंत लागल्या होत्या. या वाहतुक कोंडीमुळे काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पातलीपाडा, आनंदनगर भागातही वाहतुकीवर परिणाम झाला. सकाळी घोडबंदर मार्गावरून नोकरदार मोठ्याप्रमाणात वाहतुक करतात. त्यामुळे त्यांना देखील वाहतुक कोंडीचा फटका बसला.

वाहतुक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. शनिवारी सकाळी ८.३० नंतरही वाहतुक कोंडी कायम होती.

घोडबंदर मार्ग आणि कोंडी….

भिवंडी येथील गोदामे आणि उरण जेएनपीटी बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे गुजरात, वसई, पालघर गाठत असतात. त्यामुळे अवजड वाहनांचा मोठा भार या मार्गावर असतो. हा मार्ग ठाणे शहरातून जात असल्याने नागरिक अवजड वाहनांच्या भारामुळे हैराण आहेत. घोडबंदर भागातील काही भाग मिरा भाईंदर क्षेत्रात आहे. तर कापूरबावडी ते गायमुख हा भाग ठाणे महापालिका क्षेत्रात आहे. ठाणे शहरातील घोडबंदर भागात मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे येथील लोकवस्ती वाढली असून वाहनांच्या तुलनेत रस्ते अरुंद पडू लागले आहेत. त्यातच मेट्रो निर्माणाची कामे, सेवा रस्ता मुख्य रस्त्यामध्ये जोडणीची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरु आहेत. या कामांचा फटका देखील येथील वाहतुक व्यवस्थेला बसतो.