लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली: येथील पूर्व भागातील आयरेगाव हद्दीतील बालाजी गार्डन संकुलाच्या पाठीमागील भागात एका कार्यालयात बिगारी कामगाराला पाचजणांनी शुक्रवारी रात्री खुर्चीला बांधून ठेवले. रात्रभर त्याला बेदम मारहाण करुन गंभीर दुखापत केली आहे.

साहिल चव्हाण (२२), राहुल पाटील (३०) आणि त्यांचे तीन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. आकाश झुंजारे (२२) या बिगारी कामगाराने याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द तक्रार केली आहे. राहुल पाटील याचा वाढदिवस आहे. आपणास तो उत्साहाने साजरा करायचा आहे. तू आयरेगाव भागातील बालाजी गार्डन गृहसंकुलामागील राहुल पाटील यांच्या कार्यालयात ये, असा निरोप आरोपींनी तक्रारदार आकाश झुंजारे याला दिला.

हेही वाचा… डोंबिवली लोकलमध्ये डोंबिवलीकरांना जागा मिळेना

मित्राचा वाढदिवस असल्याने शुक्रवारी रात्री ११ वाजता आकाश हा राहुल पाटील यांच्या कार्यालयात गेला. तेथे आरोपी साहिल, राहुल आणि त्यांचे तीन साथीदार उपस्थित होते. आकाशने वाढदिवसाविषयी विचारणा केल्यानंतर पाचही आरोपींनी आकाशला पकडून कार्यालयातील प्लास्टिकच्या एका खुर्चीत बसविले. त्याला दोरीने घट्ट बांधून घेतले. त्याला पाच आरोपींनी लाथाबुक्क्यांनी कमरेच्या पट्ट्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत आकाशला गंभीर दुखापत झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli an unskilled worker was tied to a chair and beaten by five people dvr