डोंबिवली – डोंबिवली शहराजवळील शिळफाटा रस्त्यावरील लोढा प्रीमिअर येथील लिवियाना इमारतीमधील ए विंगमधील एका सदनिकेत ऑनलाईन माध्यमातून जुगार अड्डा चालविला जात आहे. या माध्यमातून सामान्य लोकांची फसवणूक केली जात आहे. अशी माहिती मिळाल्यावर ठाणे खंंडणी विरोधी पथकाने या अड्ड्यावर छापा मारून उल्हासनगर शहरासह उत्तराखंडमधील एकूण अकरा जुगार खेळणाऱ्यांवर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

या ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून जुगार खेळणाऱ्यांना या माध्यमातून काही मिनिटात झटपट रक्कम मिळते, असे आमिष हे जुगारी दाखवत होते. यासाठी खास संकेतस्थळे तयार करण्यात आली होती. या सर्व हालचाली ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या निदर्शनास आल्या. खंडणी विरोधी पथकाने या जुगार अड्ड्यावर पाळत ठेऊन शुक्रवारी डोंबिवली जवळील लोढा प्रीमिअर येथील एका सदनिकेतील ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा मारला. ऑनलाईन माध्यमातून संपर्कात असलेल्या उल्हासनगर आणि उत्तराखंड येथील अकरा जुगारींवर गुन्हा दाखल केला. जुगार खेळणारे बहुतांशी तरूण गटातील आहेत.

ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांमध्ये उल्हासनगरमधील यश वसिटा (२५, रा. श्रीराम चौक, उल्हासनगर), गौतम सत्यवासी (२२, रा.उल्हासनगर), गौरव कुमार (२१, रा. उधमसिंग, उत्तराखंड), कुणाल कुमार (२१, रा. उत्तराखंड), संजय कुमार (२२, उत्तराखंड), अरूण वसिटा (२६, श्रीराम चौक, उल्हासनगर), सागर वसिटा (२६, रा. उल्हासनगर), मालक याॅस बाबू भाई, चाचा, बाई बाॅस, एक गट प्रमुख यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.

खंडणी विरोधी पथकाचे हवालदार विनोद ढाकणे यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी गु्न्हा दाखल केला आहे. डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील लोढा प्रीमिअर येथील लिवियाना सोसायटीत ऑनलाईन माध्यमातून जुगार अड्डा चालविला जात आहे. या जुगार अड्ड्याच्या माध्यमातून सामान्य माणूस फसविला जात आहे. देशाच्या विविध भागातील जुगारी या जुगार अड्ड्यात सहभागी होत आहेत, अशी गुप्त माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. पोलिसांनी ऑनलाईन माध्यमातील जुगार अड्ड्यावर पाळत ठेवली.

शुक्रवारी लोढा प्रीमिअर येथील जुगार अड्ड्यावर खंडणी विरोधी पथकाने छापा मारून ऑनलाईन माध्यमातून या जुगार अड्डयात सहभागी असलेल्या उल्हासनगर, उत्तराखंड येथील जुगारींवर गुन्हा दाखल केला. या जुगार अड्ड्यात तरूण मुले अधिक संख्येने सहभागी असल्याचे पाहून पोलीस चक्रावून गेले. सहभागी तरूण हे व्यावसायिक असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत दिसून आले आहे.

या जुगार अड्ड्यात सहभागी होण्यासाठी जुगार प्रमुखांनी रेडीबुक, क्लब होम, पॅनेल, लासेर अशी संकेतांक असलेली ऑनलाईन संकेतस्थळ सुरू केली होती. पोलिसांची ऑनलाईन जुगार अड्ड्यावर नजर पडू नये अशी व्यवस्था जुगारींनी केली होती.

या ऑनलाईन जुगारासाठी बनावट सीमकार्ड, लॅपटाॅप, पैशांचा व्यवहार करण्यासाठी व्यक्तिगत बँक खाती यांचा वापर जुगाऱ्यांकडून केला जात होता, असे पोलिसांनी सांगितले. खंडणी विरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन कुंभार याप्रकरणाचा तपास करत आहेत.