Premium

डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावर नागरी वस्तीत दारूचे अड्डे, महिला, शाळकरी विद्यार्थी सर्वाधिक त्रस्त

पहाटे पाच ते रात्री एक वाजेपर्यंत या अड्ड्यांवर ग्राहकांची वर्दळ आणि काही जण तेथेच दारू पिऊन शिवीगाळ, हाणामारी करत असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांकडून केल्या जात आहेत.

in dombivli illicit liquor dens at residential area
डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावर नागरी वस्तीत दारूचे अड्डे, महिला, शाळकरी विद्यार्थी सर्वाधिक त्रस्त (संग्रहित छायाचित्र)

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यालगतच्या नव्याने विकसित झालेल्या, मध्यमवर्गियांची वस्ती असलेल्या भागात गावठी दारूचे अड्डे दोन इसमांकडून चालविले जात आहेत. पहाटे पाच ते रात्री एक वाजेपर्यंत या अड्ड्यांवर ग्राहकांची वर्दळ आणि काही जण तेथेच दारू पिऊन शिवीगाळ, हाणामारी करत असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांकडून केल्या जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानपाडा रस्त्यावर सागाव येथील युनियन बँकेच्या बाजुला अयप्पा मंदिराच्या बाजुला वामन बांगर नावाचा इसम आणि सागाव येथील शिवसेना शाखेच्या बाजुला, वझे चायनिज समोर प्रतिभा सितोळे नावाची महिला स्वतंत्र दोन दारूचे अड्डे चालवित असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. या दोन्ही दारु अड्ड्यांपासून उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. तेथील अधिकाऱ्यांनाही चोरुन लपून सुरू असलेल्या या अड्ड्यांची माहिती नसल्याने परिसरातील रहिवाशी आश्चर्य व्यक्त करत आहेत. आपण या अड्ड्यांची माहिती पोलिसांना दिली तर त्याचा आपणास त्रास होईल. या भीतीने कोणीही स्थानिक रहिवासी या अड्ड्यांविषयी तक्रार करण्यास पुढे येत नाही.

हेही वाचा : डोंबिवली लोकल मधील महिला डब्यात पुरूष फेरीवाल्यांची घुसखोरी, महिला प्रवासी त्रस्त

पहाटे पाच वाजल्यापासून हे दोन्ही गावठी दारुचे अड्डे सुरू होतात. डोंबिवली परिसरातील मजूर, कष्टकरी आणि इतर रहिवासी या अड्ड्यांवर दारू पिण्यासाठी येतात. दारू विक्री करणाऱ्या महिलेच्या अड्ड्यावर सर्वाधिक ग्राहकांची गर्दी असते. या अड्ड्यांवर दारू पिऊन झाल्यावर काही ग्राहक अति सेवन झाल्याने रस्त्यावर पडतात. काही जण शिवीगाळ, हाणामारी करत तेथे रेंगाळत बसतात. या अड्ड्यांच्या समोर, बाजुला शाळकरी विद्यार्थ्यांच्या बस उभ्या राहतात. अनेक पालक सकाळ, दुपार, संध्याकाळ आपल्या मुलांना घेण्यासाठी बस थांब्यावर येतात. महिलांची संख्या यामध्ये सर्वाधिक असते. त्यांना दारू पिऊन रस्त्यावर रेंगाळणाऱ्या ग्राहकांचा सर्वाधिक त्रास होतो. अनेक नोकरदार महिला, पुरूष रात्रीच्या वेळेत या अड्ड्यांच्या भागातून येजा करतात. त्यांना या दारूड्या ग्राहकांचा त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा : आमदार गणपत गायकवाड हे कर्तृत्व शून्य आणि पोपटपंचीच जास्त, कल्याण मधील शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांची टीका

या अड्ड्यांच्या जवळ एक नोंदणीकृत दारू विक्री दुकान आहे. या दुकानाचा चालक दुकाना बाहेील मोकळ्या जागेत मंचावर मद्य ठेऊन त्याची ग्राहकांना किरकोळ पध्दतीने विक्री करतो. मद्य सेवन केलेले ग्राहक या भागात उभे असतात. महिलांची छेडछाड करतात, अशा तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या. मध्यवर्गियांची वस्ती असलेल्या या भागात दारू अड्डे आणि तेथील ग्राहकांचा त्रास होत असल्याने या भागातील रहिवासी विशेषता महिला वर्ग सर्वाधिक त्रस्त आहेत. डोंबिवली विभागाचे उत्पादन शुल्क निरीक्षक किरण पाटील यांना यासंदर्भात संपर्क केला. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

हेही वाचा : ठाणे खाडीतील बोटीमध्ये स्फोटकं आढळल्याने खळबळ; १६ जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटरचा साठा जप्त

“मानपाडा रस्त्यावर सागाव येथे दारू अड्डे सुरू असतील तर तेथे तात्काळ कारवाई पथक पाठवितो. तेथील दारूसह सर्व सामान जप्त करुन विक्रेत्याला ताब्यात घेतो. ही कारवाई तात्काळ करतो. पुन्हा तेथे अड्डा सुरू होणार नाही यासाठी विशेष त्या भागात लक्ष ठेवले जाईल”, असे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In dombivli illicit liquor dens at residential area students and residents facing problems on manpada road css

First published on: 13-09-2023 at 14:57 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा